आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटपटूला जेवढी जास्त प्रसिद्धी मिळते, तेवढाच त्याला मानसिकदृष्ट्या येणारा दबावही जास्त असतो. अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची दमदार सुरुवात केली खरी. पण मानसिक दबावामुळे त्यांची कारकिर्द अपेक्षेपेक्षा लवकर संपुष्टात आली. भारतीय संघात विनोद कांबळी, लक्ष्मण शिवरामकृष्णन, नरेंद्र हिरवानी अशी निवडक नावे या यादीत आपल्याला सहज मिळतात. या यादीत अजून एक नाव येते ते ‘मनिंदर सिंग’ यांचे.
एक वेळेला या गोलंदाजाची तुलना महान भारतीय फिरकीपटू बिशन सिंग बेदींसोबत केली जात होती. पण, आज तेच गोलंदाज त्यांच्या गोलंदाजीपेक्षा जास्त क्रिकेट इतिहासातील २ बरोबरीत सुटलेल्या कसोटी सामन्यांचा भाग असण्यासाठी आणि ड्रग्स प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागण्यासाठी ओळखले जातात.
सचिन तेंडुलकरपुर्वी सर्वात कमी वयात पदार्पण करण्याच्या विक्रम
१९६५ साली महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मलेल्या मनिंदर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुुरुवात वयाच्या १७व्या वर्षी केली होती. डिसेंबर १९८२मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कराची येथील कसोटी सामन्यातून मनिंदर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय फक्त १७ वर्षे १५३ दिवस इतके होते. यासह सर्वात कमी वयात कसोटीत पदार्पण करण्याऱ्या भारतीयाचा नवा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला होता. मात्र, १९८९मध्ये वयाच्या १६व्या वर्षी आणि २०५व्या दिवशी कसोटीत पदार्पण करत सचिन तेंडुलकरने तो विक्रम आपल्या नावावर केला.
क्रिकेट कारकिर्द
कराची येथील पदार्पणाच्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि ८६ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. परंतु, २३ षटकात ६७ धावा देत एकही विकेट न घेताही मनिंदर यांनी त्यांच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्यानंतर मनिंदर यांनी कसोटी कारकार्दीत फक्त ३५ कसोटी सामने खेळत ८८ विकेट्स मिळवल्या होत्या. यात त्यांच्या १०७ धावा देत १० विकेट्स घेतलेल्या उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीचा समावेश होता. आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत मनिंदर यांनी २ वेळा एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. शिवाय, वनडेत त्यांनी ५९ सामन्यात ६६ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
ऐतिहासिक अनिर्णीत कसोटी सामन्यात बाद होणारे शेवटचे फलंदाज
मनिंदर सिंग हे क्रिकेट इतिहासात बरोबरीत सुटलेल्या २ ऐतिहासिक कसोटी सामन्यांपैकी एका निर्णायक क्षणाचा भाग होते. १९८६सालच्या मद्रास येथील ऑस्ट्रेलिया विरुद्ध बरोबरीत सुटलेल्या कसोटी सामन्यात मनिंदर सिंग यांनी शेवटी फलंदाजी केली होती. या सामन्यातील चौथ्या डावात ३४४ धावांवर भारताने ९ विकेट्स गमावल्या होत्या. रवि शास्त्रींनी तेव्हापर्यंत धु्व्वाधार फलंदाजी करत ४५ धावा केल्या होत्या. भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर शास्त्रींना एकही धाव घेता आली नाही. तर, दुसऱ्या चेंडूवर त्यांनी २ धावा घेतल्या.
तिसऱ्या चेंडूवर २ धावा घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शास्त्रींना एकच धाव घेता आली आणि मनिंदर स्ट्राइकवर आले. चौथ्या चेंडूवर मनिंदर यांना एकही धाव घेता आली नाही आणि ५व्या चेंडूवर ग्रेग मॅथ्यूज याने त्यांना पायचीत केले. मनिंदर यांच्या विकेटमुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात ३४७ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला.
असे असले तरी, अजूनही या गोष्टीवर वाद आहेत. क्रिकेट विशेषज्ञ म्हणतात की, चेंडू मनिंदरच्या बॅटला लागल्यानंतर पायाला लागला होता. निर्णायक क्षणावर एकही धाव घेऊ न शकणाऱ्या मनिंदर यांनी पुढे रणजी ट्रॉफीत सलामीला फलंदाजी करत शतक ठोकले होते.
खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघातून झाले बाहेर
काही दिवसांनी जास्त विकेट्स घेण्यासाठी वेगवेगळे गोलंदाजी प्रयोग केल्याने मनिंदर यांना विकेट मिळणे बंद झाले. शेवटी १९९०ला त्यांना भारतीय संघातून बाहेर करण्यात आले. ४ वर्षांनंतर म्हणजे १९९४ला झिम्बाब्वेविरुद्धच्या दिल्ली येथील कसोटी सामन्यातून मनिंदर यांनी पुनरागमन केले. यावेळी त्यांनी कसोटीच्या दोन्ही डावात मिळून ७ विकेट्सही घेतल्या होत्या. पण, निवडकर्ते जास्त प्रभावित झाले नाही आणि त्यांना संघातून असे बाहेर केले. अशाप्रकारे वयाच्या २७व्या वर्षी मनिंदर यांची कारकिर्द संपुष्टात आली.
संघातून बाहेर केल्याच्या दबावात घेतले ड्रग्स
दुसऱ्यांदा संघातून काढण्यात आले म्हणून मनिंदर हे इतके दबावात आले की, ते खूप दारु पिऊ लागले. सोबतच त्यांनी ड्रग्स घेण्यासही सुरुवात केली. हळूहळू ते इतके मानसिक दबावात आले की, त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण हा अपघात असल्याचे सांगून त्यांनी प्रकरण दाबून टाकले. मनिंदर ड्रग्स घेताना पकडले गेल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केले होते आणि कारागृहातही टाकले होते. पण नंतर त्यांनी या वाईट सवयीपासून स्वत:ची सुटका केली.
ट्रेंडिंग घडामोडी-
२ सामने खेळणारा शुभमन गिल पाहतोय ‘या’ दिग्गज खेळाडूंचा…
धोनी चित्रपटाची तयारी करताना सुशांतची फ्रक्चर झाली होती २ बोटं, कोच हातात काठी घेऊन…
एमएस धोनी चित्रपटात काम केलेला हा अभिनेता म्हणतो, सुशांत म्हणायचा…