काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये २१३ जागांवर यश मिळवत पुन्हा एकदा तृणमूल पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली आहे. त्यांनंतर आता मंत्रिमंडळाकडे विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यानुसार भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीकडेही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सोमवारी (१० मे) राज्यभवनात ममता बॅनर्जी यांच्या ४३ सदस्ययी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात मनोज तिवारीने राज्याचा युवा कल्याण व क्रीडा मंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. त्यामुळे आता मनोज तिवारी पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री म्हणून काम पाहिल.
मनोज तिवारीने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंप्रमाणे राजकारणात प्रवेश केला होता. त्याने मार्चमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत शिवपुरमधून उमेदवारी मिळाली. तिथे त्याने भाजपच्या डॉ. रतिन चक्रवर्ती यांना पराभूत करत राजकारणाच्या मैदानावर रॉयल एन्ट्री घेतली.
यापूर्वी क्रीडामंत्रीपदी होते हे खेळाडू
विशेष म्हणजे मनोज तिवारी हा पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री बनणारा पहिलाच क्रिकेटपटू नाही. यापूर्वी लक्ष्मी रतन शुक्ला या भारतीय क्रिकेटपटूने देखील पश्चिम बंगालमध्ये क्रीडामंत्री म्हणून काम पाहिले आहे. ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळातच २०१६ ते २०२१ या काळात लक्ष्मी रतन शुक्लाने युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय सांभाळले होते. परंतू यावेळी त्याने निवडणूकीतून माघार घेतली होती. दुसऱ्या बाजूला बंगाल विधानसभेत अशोक दिंडाच्या रुपाने क्रीडा मंत्री झालेल्या मनोज तिवारीला एक भक्कम विरोधक मिळाल्याचे बोलले जात आहे.
तसेच यापुर्वी २०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रिय मंत्रीमंडळात राजवर्धन सिंग राठोड या माजी क्रिडापटूने क्रीडा राज्यमंत्रीपद सांभाळले होते. तेव्हा देशात क्रीडामंत्रीपदाची धुरा सांभाळणारे ते पहिले क्रीडापटू ठरले होते. अँथेन्स ऑलिंपीक्समध्ये राठोड यांनी डबल ट्रॅप प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. जयपुर ग्रामीणमधून २०१४ व २०१९ मध्ये राठोड लोकसभेवर निवडूण आले असून त्यांना २०१९नंतर मात्र क्रीडामंत्रीपदावर कायम करण्यात आले नाही. २०१९पासून किरण रिजीजू हे केंद्रिय मंत्रीमंडळात क्रीडा मंत्रालय सांभाळतात.
मनोज तिवारीची क्रिकेट कारकीर्द
भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनोज तिवारीने आतापर्यंत एकूण १२ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याला २६.१ च्या सरासरीने २८७ धावा करण्यात यश आले आहे. यात १ शतक आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. यात त्याने ५ गडी देखील बाद केले आहेत. तसेच त्याने ३ टी-२० सामन्यात १५ धावा केल्या होत्या. परंतु दमदार कामगिरीनंतरही त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१५ साली त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
याबरोबरच प्रथम श्रेणी क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर, त्याने १२५ सामने खेळले होते. यात त्याला ५०.४ च्या सरासरीने ८९६६ धावा करण्यात यश आले होते. यात त्याने २८ शतक आणि ३७ अर्धशतक झळकावले होते. तसेच १६३अ दर्जाच्या सामन्यात त्याने ५४६६ धावा केल्या होत्या. यात त्याने ६ शतक आणि ४० अर्धशतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ओहो! कोणाचीही फिकीर न करता राहुल तेवतियाचा खुल्लम खुल्ला प्रपोजल, पाहा तो भारी क्षण
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचा थाटच न्यारा, कोट्याधीश नव्हे तर चक्क अब्जाधीशांच्या घरचे आहेत लाडके जावई
पहिला डोस; टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने घेतली कोरोनाची लस, देशवासीयांना केले आवाहन