---Advertisement---

अनेक प्रतिभावान खेळाडू गायब झाले..’, वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा सावधगिरीचा सल्ला! नेमकं काय म्हणाले?

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2026 6:39 PM
---Advertisement---


टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) अवघ्या 15 वर्षांच्या वयात आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैभव सध्या केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याने भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे. वैभवकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे.

मात्र, भारताचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव (Kapil Dev on Vaibhav Suryavanshi) यांना वैभवच्या भविष्याबाबत आत्ताच मोठी भविष्यवाणी करणे घाईचे वाटते. त्यांच्या मते, क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आले, पण ते आपल्या प्रतिभेनुसार दीर्घकाळ कामगिरी करू शकले नाहीत आणि नंतर गायब झाले.

कपिल देव यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “आत्ताच काहीही सांगणे घाईचे ठरेल. त्याच्यात क्षमता आहे का? होय. पण क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आले, ज्यांच्यात खूप क्षमता होती, मात्र नंतर ते गायब झाले. विनोद कांबळीचेच उदाहरण घ्या. त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार?

विनोद कांबळी (Vinod kambli) यांनाही त्यांच्या सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेटमधील मोठा स्टार मानले जात होते. मात्र, ते आपल्या कारकिर्दीत सातत्य राखू शकले नाहीत. शानदार सुरुवात करूनही ते आपली कारकीर्द मोठी करू शकले नाहीत. कांबळी यांनी भारतासाठी 17 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळले.

कपिल देव यांनी सांगितले की, वैभवला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून वेळ दिला पाहिजे. खेळाडूची जीवनशैली आणि विचार करण्याची पद्धत जसजशी बदलते, त्यावरून तो भविष्यात कशी कामगिरी करेल, हे समजते, असे त्यांनी म्हटले.

ते म्हणाले, वैभव अजून 15 वर्षांचा आहे. त्याला आणखी तीन वर्षे द्या, त्यानंतर आपण बोलू. जीवनशैली बदलली की विचारसरणीही बदलते. त्यानंतर वैभव पुढे कसा दिसतो, हे समजेल. हे त्याच्या कामगिरीपेक्षाही महत्त्वाचे ठरणार आहे.

कपिल देव यांनी पुढे सांगितले की, त्यांना असा खेळाडू पाहायचा आहे, जो जवळपास 15 वर्षे भारतासाठी खेळेल. विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पुढील मोठे नाव कोण असेल, हे पाहण्याची त्यांची इच्छा आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दमदार कामगिरी केली. त्याने 16 सामन्यांत 776 धावा केल्या. यात एका शतकासह 5 अर्धशतकांचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही वैभवच ठरला.

या हंगामात वैभवने तब्बल 72 षटकार मारले आणि एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने ख्रिस गेलचा (Khris gayle) विक्रम मागे टाकला. गेलने आयपीएल 2012 मध्ये 59 षटकार मारले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---