पुणे । राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आज मार्सिलीन्हो याला 2018-19 या मौसमासाठी आपल्याकडेच कायम राखण्याची घोषणा केली. एफसी पुणे सिटी संघाकडून सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंपैकीच एक असलेल्या मार्सिलीन्हो च्या नेतृत्वाखाली एफसी पुणे सिटी संघाने गेल्या मौसमात प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारताना ऐतिहासिक कामगिरी केली होती.
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, आपल्याकडे असलेला सर्वोत्तम खेळाडू जाऊ देणे, आम्हांला परवडणारे नव्हते. ब्राझीलचा अव्वल खेळाडू असलेला मार्सिलीन्हो केवळ एक फुटबॉलपटू नसून एक महान कर्णधारही आहे. त्याच्या नेतृत्वाखाली एफसी पुणे सिटी संघाने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. एफसी पुणे सिटी संघाचे खेळाडू, चाहते, व्यवस्थापन या सर्वांवर त्याच्या कामगिरीचा ठसा आहे आणि गेल्या मौसमाप्रमाणेच यंदाही त्याच्या नेतृत्वाखाली एफसी पुणे सिटी संघ आणखी चांगली कामगिरी करून दाखवेल, असा आम्हांला विश्वास वाटतो.
एफसी पुणे सिटी संघाकडून गेल्या मौसमात मार्सिलीन्होने 17 सामन्यात 8 गोल नोंदविले होते. त्यातही नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाविरुद्ध एक हॅट्ट्रिक नोंदविली होती. आणखी 7 गोल करण्यासाठी उत्कृष्ट असिस्ट करताना त्याने आपल्या सहकाऱ्यांसाठी एक आदर्श खेळाडू असल्याचे दाखवून दिले होते. गेल्या आठवड्यात एमिलियानो अल्फारो हा सुद्धा एफसी पुणे सिटी संघात सामील झाला आल्यामुळे त्या दोघांच्या संयुक्त कामगिरीमुळे एफसी पुणे सिटी संघ आणखी चांगली कामगिरी करून दाखवेल यात शंका नाही.
मर्सिलीनो म्हणाला कि, पुन्हा एकदा एफसी पुणे सिटी संघात सामील होताना मला अतिशय आनंद होत आहे. एफसी पुणे सिटी हे आता माझे दुसरे घरच बनले आहे. आम्ही गेल्या मौसमात ऐतिहासिक कामगिरी केली आणि नव्या मौसमात त्याहीपेक्षा चांगली कामगिरी करून दाखविण्याचा आमचा निर्धार आहे.बालेवाडी येथे एफसी पुणे सिटी संघाच्या सरावात सामील होण्यास मी अतिशय उत्सुक आहे आणि आगामी मौसमाकडे मी अतिशय आत्मविश्वासाने पाहत आहे.