ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने एक षटक शिल्लक असताना पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. मॅथ्यू वेडने (४१*) वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या एकोणिसाव्या षटकात लागोपाठ ३ षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले. या दमदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. वेडने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. मार्कस स्टॉयनिसने ३१ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह सलग ४० धावा केल्या. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील त्याच्या धुवांधार खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, अपयशामुळे त्याला खूप प्रेरणा मिळाली आहे आणि त्यामुळेच त्याने या सामन्यात चांगली कामगिरी केली. स्टॉयनिसला सांगण्यात आले होते की, त्याच्याकडे सामना संपवण्याची क्षमता नाही, त्यामुळे तो खूप इर्षेला पेटला होता.
पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पाच विकेट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ संकटात सापडला होता. मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी दमदार खेळी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी ४१ चेंडूत ८१ धावांची जलद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
मार्कस स्टॉयनिसच्या म्हणण्यानुसार, तो याआधी संघाला विजय मिळवून देण्यात अनेकदा अयशस्वी झाला होता, आणि याच कारणास्तव त्याला संघाला विजय मिळवून देऊन, चांगली कामगिरी करायची होती. जेणेकरून तो लोकांना चुकीचे सिद्ध करू शकेल. एका वृत्तानुसार, तो म्हणाला की, “तुम्ही तुमच्या भूतकाळातील अनुभवातून नक्कीच शिकता. मी यापूर्वी अशा परिस्थितीत अपयशी ठरलो होतो. त्यानंतर मला सतत सांगण्यात येत होते की मी संघाला सामना जिंकवून देऊ शकत नाही, पण मी त्यांना आता चुकीचे सिद्ध केले आहे.”
वनडे विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे मार्कस स्टॉयनिसला ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघातून वगळण्यात आले. मात्र, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो पुन्हा संघात परतला होता. स्टॉयनिसने आयपीएल २०२० मध्ये १७ सामन्यांमध्ये १४८ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ३५२ धावा केल्या.