पुणे । क्रोएशियाच्या मरीन चिलीच याने टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे . जागतिक क्र.7 असलेल्या चिलीचने आपल्या सोशल मीडियावरून हे जाहीर केले आहे.
यावेळी मरीन चिलीच म्हणाला कि, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्यामुळे मला दुःख झाले आहे. संयोजक आणि माझ्या चाहत्यांची मी मनापासून माफी मागत आहे. गुडघ्यावरील दुखापतीपासून मी सावरतच होतो आणि या मौसमाची शेवटाला ही दुखापत आणखी वाढू लागली. ऑफ सीजन दरम्यानच्या उपचाराची नक्कीच मदत होणार आहे. परंतु या स्पर्धेत सहभागी जरी झालो तरी सध्या मी100टक्के योगदान देऊ शकत नाही. भारतात बरेच वर्षे नवे साजरे करत असून या वर्षी मला ते साजरे करता येणार नाही. परंतु पुढच्या वर्षी मी नक्की साजरे करेन, अशी आशा आहे.
स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले कि, या स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याने त्याने आपली दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याच्यासारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूचा खेळ पाहता येणार नाही. पण त्याचबरोबर या स्पर्धत गतविजेता फ्रेंच खेळाडू सिमॉन जाईल्स तसेच, केविन अँडरसन, हुयोन चूँग आणि मालेक झाजेरी या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी टेनिस प्रेमींना मिळणार आहे. मरीन चिलीचला दुखापतीपासून लवकर बरे होण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो.