भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५वा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला कारण मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने मालिकेत मोठी आघाडी घेतली होती, पण टीम इंडियाने अप्रतिम पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला. या मालिकेत भारताकडून अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, त्यात भुवनेश्वर कुमारच्या नावाचाही समावेश आहे.
भुवनेश्वरने अप्रतिम गोलंदाजी करताना ४ डावात केवळ ६ विकेट्स घेतल्या नाहीत तर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही जिंकला. भुवीने पॉवरप्लेमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते पाहून दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरही प्रभावित झाले. पॉवरप्लेमध्ये भुवीच्या गोलंदाजीमुळे आमच्या संघावर दबाव आला होता, अशी कबुली दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू मार्क बाउचरने दिली.
गेल्या दोन वर्षांपासून ३२ वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर खराब फॉर्म आणि दुखापतीशी झुंजत होता, मात्र त्याने आयपीएल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार पुनरागमन केले. त्याने आयपीएलच्या १५ व्या हंगामात ७.३४ च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट घेतल्या. यानंतर कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने केवळ १३ धावांत ४ बळी घेतले.
पाच सामन्यांच्या मालिकेत, भुवनेश्वरने पॉवरप्लेमध्ये त्याच्या चांगल्या लांबीच्या चेंडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना खूप त्रास दिला, परिणामी पाहुण्या संघाला गेल्या तीन सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करता आली नाही. मालिकेनंतर बाउचर म्हणाला, “भुवी संपूर्ण मालिकेत खास होता. आम्ही उत्कृष्ट गोलंदाजीचा सामना केला. भुवनेश्वरने पॉवरप्लेमध्ये आमच्यावर दबाव आणला. एक सामना (दिल्ली) वगळता भारताने पॉवरप्लेमध्ये चेंडू आणि बॅटने आमच्यावर दबाव आणला.
या मालिकेवर भाष्य करताना बाउचर म्हणाला की, “मला माहित आहे की अनेक अव्वल भारतीय खेळाडू या मालिकेत खेळत नव्हते, परंतु भारतीय क्रिकेट या क्षणी जे खोलवर आहे ते मुख्यत्वे आयपीएलमुळे आहे. तुम्ही भारतात येऊन मालिका जिंकू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोन चांगले आणि दोन वाईट सामने खेळलो. यामागे काहीतरी कारण आहे.”
दरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंना आयपीएलच्या प्रदीर्घ हंगामानंतर टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्याचवेळी कुलदीप यादव आणि केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर गेले. अशा स्थितीत पाहुणा संघ विजयाचा दावेदार मानला जात होता मात्र भारताने मालिकेत बरोबरी साधली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक टी२० विश्वचषक खेळणार?, प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे संकेत
भारतीय माजी दिग्गजांनी थेट सचिन अन् गिलख्रिस्टसोबत केली पंतची तुलना, म्हणाले…
‘आम्ही मालिका जिंकण्यासाठी उत्सुक’, राहुल द्रविडने व्यक्त केली भावना