ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क वॉ यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर मी निवडकर्ता असतो, तर मी रोहित शर्माला धन्यवाद म्हटलं असतं आणि त्याच्या सेवेबद्दल आभार मानलं असतं. रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियात फलंदाज आणि कर्णधार म्हणून संघर्ष करत आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेतही त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती.
37 वर्षीय रोहित शर्मानं कसोटीच्या गेल्या 14 डावांमध्ये केवळ 155 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 11च्या आसपास राहिली. कर्णधार म्हणून गेल्या 5 पैकी 4 कसोटीत तो पराभूत झालाय. याबाबत ‘फॉक्स क्रिकेट’वर बोलताना मार्क वॉ म्हणाले, जर रोहित शर्मा मेलबर्न कसोटी जिंकला नाही आणि तो फलंदाज म्हणून दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आणि मी जर सिलेक्टर असतो तर मी त्याला सिडनी कसोटीतून ड्रॉप केलं असतं. मी त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवलं असतं.
मार्क वॉ म्हणाले, “जर मी आता निवडकर्ता असतो, तर दुसऱ्या डावात काय होतं यावर ते अवलंबून असतं. पण जर त्यानं दुसऱ्या डावात धावा केल्या नाहीत आणि आम्ही सिडनीमध्ये महत्त्वाचा कसोटी सामना खेळायला गेलो तर मी म्हणेन, “रोहित, तुझ्या सेवेबद्दल धन्यवाद. तू एक उत्कृष्ट खेळाडू आहेस, परंतु आम्ही जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीसाठी कर्णधार म्हणून आणणार आहोत. हा तुझ्या करिअरचा शेवट असेल.”
मार्क वॉ पुढे म्हणाले, “रोहित शर्मासाठी हा खूप कठीण रस्ता असेल. शेवटच्या 14 डावांमध्ये त्याची सरासरी 11 आहे. यावरून तो त्याच्या सर्वोत्तम खेळापासून दूर असल्याचं संकेत मिळतात. हे सर्व खेळाडूंसोबत घडतं. सर्वच महान खेळाडू कधी ना कधी फिनिश होतात.” या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माला एकदाही एका डावात 20 पेक्षा अधिक धावा काढता आलेल्या नाहीत. त्यानं या मालिकेत केलेल्या एकूण धावांची संख्या जसप्रीत बुमराहनं घेतलेल्या विकेट पेक्षा कमी आहे.
हेही वाचा –
कसोटीत सर्वात जलद 200 बळी घेणारे 3 भारतीय गोलंदाज
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान यष्टिरक्षक फलंदाज जखमी, संपूर्ण मालिकेतून बाहेर
जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली