काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व राखताना ऑस्ट्रेलियाला ३-१ ने पराभूत केले. या मालिकेबरोबरच आंतराष्ट्रीय क्रिकेटचा यावर्षीचा मोसमही संपला. त्यानंतर आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
या कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करमने सहा स्थानांची प्रगती करून फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत नववे स्थान मिळावले आहे. त्याचबरोबर त्याने पहिल्या १० कसोटी फलंदाजांमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांने आत्तापर्यंत फक्त १० कसोटी सामने खेळले आहेत. तसेच त्याने यात १००० धावाही पूर्ण केल्या आहेत.
त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये ४ सामन्यात(८ डावात) मिळून ६० च्या सरासरीने ४८० धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला पहिल्या दहा कसोटी फलंदाजांमध्ये स्थान मिळाले आहे.
याबरोबरच त्याचे संघासहकारी कर्णधार फाफ डुप्लेसिस(१७ व्या स्थानी) आणि टेम्बा बाऊमा(३९ व्या स्थानी) यांच्याही क्रमवारीत सुधारणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेननेही ८ स्थानांची प्रगती करून ५३ वे स्थान मिळवले आहे. या कसोटी फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातही कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला. या मालिकेनंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट (तिसऱ्या स्थानी) , यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो(१३ व्या स्थानी) आणि मार्क स्टोनमन(६४ व्या स्थानी) यांच्या क्रमवारीतही प्रगती झाली आहे.
त्याचबरोबर गोलंदाजी कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या व्हर्नोन फिलँडरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात ५१ धावा देऊन ९ विकेट मिळवल्या. तसेच त्याने ४ सामन्यात मिळून १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने तिसरे स्थान मिळवले आहे.
या क्रमवारीत कागिसो रबाडा अव्वल स्थानी कायम आहे. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी ३ स्थानांची प्रगती करून १३ व्या तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ५ स्थानांची प्रगती करून १२ व्या स्थानी पोहोचला आहे. मात्र न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड मालिकेचा मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या ट्रेंट बोल्टच्या क्रमवारीत १ स्थानाची घसरण झाली आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे. तसेच फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली दुसऱ्या आणि चेतेश्वर पुजारा सातव्या स्थानी कायम आहेत. तर गोलंदाजी क्रमवारीत रवींद्र जडेजा आणि आर अश्विन अनुक्रमे ४ थ्या आणि ५ व्या क्रमांकावर आहेत.