न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेच्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला आहे. यासह न्यूझीलंडने मालिका ३-२ ने जिंकली. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच टी२० मालिका जिंकली आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १४२ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाने १५.३ षटकांत तीन गडी गमावून सहजरीत्या हे लक्ष्य गाठले. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक सलामीवीर मार्टिन गप्टिल ठरला. त्याने ४६ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. यासह त्याने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला मागे टाकत टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
गप्टीलने टाकले रोहितला मागे
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माला मागे टाकून मार्टीन गप्टिल आता दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. गप्टिलने दोन शतके आणि १७ अर्धशतकांच्या मदतीने ९९ सामन्यांत २८३९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत चार शतके आणि २१ अर्धशतकांसह २७७४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ८५ सामन्यांत २९२८ धावा बनवून अव्वलस्थानी कायम आहे. गप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत दोन अर्धशतकांच्या मदतीने २१८ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा मालिका विजय
कोरोना महामारीनंतर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे शेजारी देश या टी२० मालिकेच्या रूपाने प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पहिल्या दोन सामन्यात यजमान न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, पुढील दोन सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने जबरदस्त पुनरागमन करत न्यूझीलंडवर मात केली. अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून प्रथमच ऑस्ट्रेलियाला टी२० मालिकेत पराभूत करण्याची किमया करून दाखवली. मालिकेत १३ बळी मिळवणाऱ्या ईश सोढीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
दे घुमा के! मार्टिन गप्टिलच्या जबरा सिक्सरचा चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर, व्हिडिओ व्हायरल
४६ वर्षीय शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर साखरपुडा
‘ही’ आहे जसप्रीत बुमराहची वाग्दत्त वधू? स्पोर्ट्स अँकर म्हणून आहे प्रसिद्ध