क्रिकेटविश्वात दररोज कित्येक जुने विक्रम मोडत असतात आणि नवे विक्रम बनत असतात. काही दिवसांपुर्वी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाच सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. या मालिकेत खोऱ्याने धावा काढत भारताचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला होता. याबाबतीत त्याने न्यूझीलंडचा धाकड फलंदाज मार्टिन गप्टिल याला मागे टाकले होते.
आता त्याच गप्लिटने रोहितला पछाडत टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्यांच्या यादीत पुन्हा दुसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे.
बांगलादेश संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून उभय संघात रविवारी (२८ मार्च) पहिला टी२० सामना पार पडला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना गप्टिलने ३५ धावा केल्या. २७ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या उभारली. या छोटेखानी खेळीसह तो टी२०त सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात रोहितवर वरचढ ठरला आहे.
विशेष म्हणजे, गप्टिलने त्याच्या १०० व्या टी२० सामन्यात हा पराक्रम केला आहे. ३५ धावांच्या छोटेखानी खेळीसह त्याने २८७४ धावा केल्या आहेत. यासह तो विराट कोहलीनंतर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. कोहली ९० टी२० सामन्यात ३१५९ धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. तर रोहित २८६४ धावांसह तिसऱ्या स्थानावर आला आहे. १११ टी२० सामन्यात त्याने या धावांची खात्यात नोंद केली आहे.
अशाप्रकारे पंधरा दिवसांपेक्षाही कमी कालावधीत गप्टिलने रोहितचा विक्रम मोडीत काढत त्याला पछाडले आहे. कदाचित भारतीय संघाच्या पुढील टी२० मालिकेत रोहित पुन्हा गप्टिलला मागे टाकत दुसऱ्या स्थानी उडी घेईल.
महत्त्वाच्या बातम्या-
एका चुकीमुळे संकटात सापडला होता युवराज, परंतू आता होणार नाही कोणतीही कारवाई
टीम इंडियाच्या कुलदीप-चहल जोडीच्या प्रदर्शनात बिघाड, यामागचे कारण ‘कॅप्टनकूल’ तर नव्हे! पाहा कसं
कृणाल भारतीय संघाचा पाचवा गोलंदाज असूच शकत नाही; भारतीय दिग्गजाचे मोठे भाष्य






