भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे..होय क्रिकेटवेड्यांचाच, क्रिकेटप्रेमींचा नव्हे.
कारण या खेळावर आपण जेवढं प्रेम करतो तितकं प्रेम जगात कुठलाच देश करत नाही, अगदी जिथे याचा शोध लागला त्या इंग्लंडमध्ये देखील. भारतात जेव्हा जेव्हा क्रिकेट हा शब्द उच्चारला जातो तेव्हा लगेचच दुसरा शब्द हा निसंशयपणे सचिनच असणार…. सचिन रमेश तेंडुलकर. या नावाला भारतीय क्रिकेटवेड्यांनी देवपण बहाल केलंय आणि ते योग्य देखील आहे.
सचिन हा क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला आहे इतका तो क्रिकेटमय आहे. त्याचं आयुष्यच त्याने क्रिकेटला समर्पित केलंय असं म्हणणं अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. उच्च कोटीची दुर्मिळ गुणवत्ता आणि त्याला तितक्याच जोडीची मेहनत. असे खेळाडू कित्येक शतकात जन्म घेत नाहीत. असे कित्येक किस्से आहेत जे सचिनचं समर्पण दाखवतात.
अगदी लहानपणापासूनच ते त्याच्यामध्ये होत. त्याची ही गुणवत्ता सगळ्यात आधी त्याच्या भावाने ओळखली. घरच्यांनी देखील पाठिंबा दिला. मग प्रशिक्षणासाठी आचरेकर सरांकडे क्रिकेटची बाराखडी गिरवणे सुरु झाले. पण एक अडचण होती. घर खूप लांब होतं. शाळा आणि प्रशिक्षण दोन्हीचा मेळ घालताना लहानगा सचिन थकून जायचा. मग असं ठरलं कि सचिनने त्याच्या काकांकडे रहायचं. लहानगा सचिन तयार झाला.
आई वडीलांपासून दूर राहायची त्याने जी तयारी दाखवली तिथेच लक्षात आलं की यालाच समर्पण म्हणतात. काकांकडे तो बरेच दिवस राहिला. त्याच्या पुढील आयुष्यात देखील पावलोपावली त्याने हे समर्पण दाखवलं. हे समर्पण त्याच्या पूर्ण आयुष्याचं होत. त्यातले काही प्रसंग असे आहेत की ते कळल्यावर आपण सचिनला सलाम केल्याशिवाय राहत नाही.
अगदी सुरुवातीचा प्रसंग. सचिनची निवड भारतीय टीममध्ये खूपच लवकर झाली. तो त्याच्या आयुष्यातील पहिल्या पाकिस्तान दौऱ्यासाठी गेला तेव्हा टीममध्ये सर्वात लहान होता. पाकिस्तानकडे तेव्हा एकाचढ एक वेगवान गोलंदाज होते. त्यांचा मारा जबरदस्त होता. एका सामन्यात भारताचे रथी महारथी फलंदाज सपशेल शरणागती पत्करून वापस गेले. सचिन मैदानावर आला. सोबतीला सिद्धू होता आणि अचानक एका उसळणाऱ्या चेंडूने सचिनला जबरी दुखापत झाली. रक्त देखील येत होतं. परंतु सचिन खेळला. नुसताच खेळला नाही तर चोख उत्तर दिलं. त्याची जिगर त्याने दाखवून दिली.
ही तर सुरुवात होती. सचिनचा काळ म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक दिग्गजांचा काळ. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड या देशातील दिग्गज गोलंदाज यांच्या देखील उदयाचा काळ. पण या सर्वांवर सचिनने लीलया हुकूमत गाजवली. कारण एकच… सचिनची अफाट मेहनत. गुणवत्ता त्यांच्यात देखील होती पण सचिनने मेहनतीच्या जोरावर त्यांचा बिमोड केला.
कुठलीही टीम भारतात खेळायला येवो किंवा भारत त्यांच्या देशात जावो, सर्वांचा निशाणा आधी सचिन असलाच पाहिजे. त्याहून गंम्मत अशी की हे सर्व गोलंदाज मोठ्या मोठ्या वल्गना करायचे. शाब्दिक वाद करायचे. मैदानावर आणि बाहेरदेखील. पण सचिन कधीच या फंदात पडला नाही. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त खेळावर.
ऑस्ट्रेलिया भारतात खेळायला येणार होता तेव्हाची गोष्ट. शेन वॉर्न हा त्यांचा उत्कृष्ट फिरकीपटू. जगभरातील दिग्गज फलंदाजांनी त्याच्या पुढे शरणागती पत्करली होती. त्याने आधीपासूनच सांगायला सुरुवात केली होती की माझे लक्ष्य फक्त सचिन. सचिनने काहीही उत्तर दिले नाही. त्याने त्याच्या शैलीचा अभ्यास केला. आणि रणनीती तयार केली. त्यावेळी मुंबई संघाकडून साईराज बहुतुले हा एक लेग स्पिनर खेळायचा. सचिनने त्याची मदत घेण्याचं ठरवलं. यासाठी त्याने वानखेडे मैदानावर एक विशेष अशी व्यवस्था करून घेतली. यात त्याने चक्क चिखलाची खेळपट्टी तयार करून घेतली. या खेळपट्टीवर साईराज अप्रतिम चेंडू वळवायचा आणि या चेंडूंवर सचिनने सराव केला. त्यानंतर वॉर्नच्या गोलंदाजीची सचिनने जी पिसं काढली त्याला तोड नाही. खुद्द वॉर्नने असं सांगितलं की त्याला स्वप्नात देखील सचिन पुढे येऊन सिक्स मारतोय असं दिसत होतं.
कुठल्याच प्रतिस्पर्ध्याला सचिनने कधीच कमी लेखलं नाही, मग तो नवखा असो की मुरलेला. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा सचिनपेक्षा अगदी नवखा. पण एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याने त्याची चांगलीच हवा केली होती. अर्थात त्याचा आणि सचिनचा सामना अजून बाकी होता. त्यामुळे एका अर्थाने त्याला जागतिक मान्यता मिळाली नव्हती. त्याने देखील वल्गना सुरु केल्या होत्या की मी सचिनला इतक्या वेगाचा चेंडू टाकणार आहे वगैरे, वगैरे. त्या वेळेस त्याने इतर फलदाजांना ताशी 160 च्या वेगाने गोलंदाजी केली होती. सचिनने यावर एक नामी उपाय शोधला. त्याने एक विशेष मशीन मागवून घेतली.मला वाटतं ऑस्ट्रेलियामधून. ही मशीन ताशी 200 च्या वेगाने चेंडू फेकायची. या मशीनवर सचिनने सराव केला. त्या नंतर सचिनने शोएबची अशी काही गत केली की तो परत काही त्याच्या वाट्याला गेला नाही. ब्रेट लीला पण असाच आडवा केला सचिनने. असे अनेक किस्से आहेत. ज्यात त्याच्यापुढे आलेली कित्येक आव्हानं त्याने जिगरबाज खेळाने आणि समर्पण वृत्तीने सहज पेलली.
सचिनचे वडील गेले तेव्हा विश्वकप सुरु झाला होता. वडिलांवर त्याचा विशेष जीव. हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खूप मोठा आघात. पण सचिनने तोही झेलला. आणि वडील गेल्याच्या अगदी चौथ्या दिवशी तो मैदानावर हजर. काय म्हणावे याला? व्यावसायिक क्रिकेट एकीकडे आणि क्रिकेट हेच जीवन मानणारा सचिन एकमेवाद्वितीय. त्यामुळे खुद्द ब्रॅडमन यांनी जेव्हा त्याला बोलावलं आणि त्याचं विशेष कौतुक केलं तेव्हा भारतीय म्हणून ऊर अभिमानाने भरून आला.
सचिनच्या नावावरील विक्रम पहिले तर ते एक दंतकथाच वाटतात. इतकं मोठं यश मिळवून देखील तो अगदी साधाच आहे, तुमच्या माझ्यासारखा. त्याच्या समर्पणाचा सर्वोच बिंदू म्हणजे..जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीची शेवटची कसोटी खेळला तेव्हा जाताना त्याने खेळपट्टीला अभिवादन केले. किती ही नम्रता..त्यापासून दूर होण्याच्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या आणि त्यामुळेच सचिनप्रेमींनी त्याला जे देवपण बहाल केलंय ते उगाच नाही. असा हा सचिन खऱ्या अर्थाने क्रिकेट विश्वातला अढळ असा ध्रुवतारा आहे. त्याची ही जागा कोणीही अगदी देवही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अशा या तुमच्या माझ्या सर्वांच्या लाडक्या सचिनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सचिन, तुला उदंड आयुष्य लाभो.
– अमोल कुलकर्णी, औरंगाबाद
( [email protected] )
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही.)