बुधवारी (दि. 14 डिसेंबर) भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकले. त्याने गोवा संघाकडून खेळताना राजस्थानविरुद्ध ही शानदार कामगिरी केली. अर्जुनने या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईच्या जागी गोवा संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सचिन देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमीच मुंबई संघाकडूनच खेळला आहे.
रणजी ट्रॉफी 2022-23 (Ranji Trophy 2022-23) स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) शतक ठोकल्यानंतर आजी-माजी दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यामध्ये त्याचे वडील आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचाही समावेश आहे. मुलाच्या प्रदर्शनाने सचिन खूपच खुश झाला आहे. त्याने एका कार्यक्रमादरम्यान या प्रश्नाचे उत्तरही दिले. त्याने यादरम्यान अर्जुनच्या पहिल्या प्रथम श्रेणी शतकावर मोकळेपणाने चर्चा केली.
सचिनला अर्जुनच्या पहिल्या शतकाबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला की, “अर्जुनचे बालपण हे सामान्य नव्हते. एक क्रिकेटपटू असल्यामुळे तो या सर्व गोष्टींच्या खूपच जवळ राहिला आहे. हे सोपे नाहीये. हे एकमेव कारण होते, जेव्हा मी निवृत्त झालो आणि मीडियाने मुंबईत माझा सन्मान केला, तेव्हा मी त्यांना हाच संदेश दिला होता की, अर्जुनला क्रिकेटच्या प्रेमात पडू द्या. त्याला ही संधी द्या. जेव्हा तो चांगले प्रदर्शन करेल, तेव्हा तुम्ही अनेक वक्तव्य करू शकता. त्याच्यावर दबाव टाकू नका. कारण, माझ्या वडिलांनीही माझ्यावर कधीच दबाव टाकला नाही. त्यांनी मला स्वातंत्र्य दिले की, मी मोकळेपणाने स्वत:ला व्यक्त करेल. माझ्यावर अपेक्षांचं ओझं नव्हतं. फक्त प्रोत्साहन आणि पाठिंब्यानेहीच आम्ही बाहेर जाऊन स्वत:ला चांगले तयार करू शकतो. मी अर्जुनला हेच सांगतो की, ‘हे खूपच आव्हानात्मक असेल. तू पूर्ण जगाला बदलू शकत नाही. आपल्याला विचार बदलायचा आहे.'”
पुढे बोलताना सचिन म्हणाला की, “त्याच्यासाठी हे सोपे नव्हते. त्याचे आयुष्य खूपच कठीण होते. तुम्ही त्याला रोहन गावसकरशी जोडून पाहू शकता.” रोहन गावसकर महान फलंदाज सुनील गावसकर यांचा मुलगा आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज असणाऱ्या रोहिनने भारतासाठी 11 वनडे सामने खेळले आहेत. बंगालसाठी त्याची चांगली प्रथम श्रेणी कारकीर्द असूनही रोहन कधीच भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही.
सचिनने असेही सांगितले की, राजस्थानविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याची अर्जुनसोबत चर्चा झाली होती. सचिन त्यावेळी म्हणाला होता की, “मी त्याला म्हणालो, जा आणि शतक कर. तो चार धावांवर फलंदाजी करत होता. त्याला नाईटवॉचमॅन म्हणून पाठवले गेले होते. त्याला विचारले, ‘तू काय विचार करतो की, या पीचवर चांगला स्कोर काय असेल?’ त्यांचा स्कोर 5 विकेटवर 210 धावा होत्या. मी म्हणालो, ‘कमीत कमी 375 तर तुला पाहिजेत.’ त्यानंतर तो म्हणाला की, ‘तुम्हाला खात्री आहे का?’ मी म्हणालो, ‘होय, तू उद्या शतक बनवले पाहिजे. तुला वाटते का तू शतक करू शकतो?'”
अर्जुन तेंडुलकर याने डावादरम्यान 207 चेंडूत 120 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 16 चौकारांचीही बरसात केली होती. (master blaster sachin tendulkar talks about his son arjun century on first class debut)