आयपीएलचा यंदाचा हंगाम कोरोनाचा धोका असून देखील भारतात खेळवण्यात आला होता. वेगवेगळया ६ शहरांत या सामन्यांचे आयोजन केले जात होते. मात्र २९ सामने झाल्यावर काही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर बीसीसीआयला हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचा निर्णय घ्यावा लागला.
मात्र आता कोरोनाची लागण झाली कशी, हा प्रश्न उभा राहिला आहे. बायो बबलच्या सुरक्षित वातावरणात खेळत असतांना हा संसर्ग झाल्याने त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता यामागील कारण समोर आले आहे.
बीसीसीआयचा हट्ट भोवला?
बीसीसीआयने हा हंगाम सहा शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दुसरा टप्पा अहमदाबाद आणि दिल्ली येथे सुरू होता. मात्र या ठिकाणी सरावाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. याच कारणामुळे खेळाडूंना इतरत्र सरावासाठी जावे लागले, आणि त्या दरम्यान बायो बबलचे उल्लंघन होऊन कोरोनाने त्यात शिरकाव केले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली. यानुसार बोर्ड आणि राज्य संघटनांना अहमदाबाद आणि दिल्ली येथे दुसर्या टप्प्याचे सामने खेळवण्याचा निर्णय चुकीचा वाटत होता. कारण या शहरांमध्ये जी मैदाने सरावासाठी निश्चित करण्यात आली होती, त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे तिथे सराव करतांना खेळाडू बायो बबलच्या बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. आणि त्यातूनच कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
अहमदाबादला आणि दिल्ली मध्ये दुसर्या मैदानांवर सराव
अहमदाबादला नवीन नरेंद्र मोदी स्टेडियम बांधले गेले असले तरी त्याच्या आसपासची मैदाने अद्याप पूर्ण सज्ज नाहीत. त्यामुळे अहमदाबादला सामने खेळणाऱ्या संघांनी गुजरात कॉलेजच्या मैदानावर सराव केला. या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि अन्य दोन संघांनी सराव केला होता. त्यानंतर कोलकाताचे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. दिल्लीत देखील चेन्नई सुपर किंग्जने रोशनआरा क्लबच्या मैदानावर सराव केला होता. या दोन्हीही मैदानांवरील कर्मचारी बायो बबलचा हिस्सा नव्हते. त्यामुळे आयपीएल मधील कोरोनाच्या शिरकावाचे हे प्रमुख कारण असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
या मैदानावर होतील भारत विरूद्ध श्रीलंकेचे सामने
एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार भारताचे दोन संघ, पाहा यापूर्वी केव्हा घडले आहे असे
सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की, कुस्ती महासंघाची त्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया