जगभरात क्रिकेट या खेळाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी क्रिकेटपटूंप्रमाणे चाहतेही आपल्या संघाच्या प्रत्येक सामन्याला खूप गांभीर्याने घेत असतात. त्यातही आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमधील सामने म्हटले की, चाहत्यांच्या भावनांचे हिंदोळे उचंबळून येतात. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गतवर्षी ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाज हसन अलीने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता. ज्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबियावरही भरपूर टीका झाली होती. आता या प्रकरणी हसन अलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हसन अली (Hasan Ali) सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप २०२२ मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तो लंकाशायर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने मॅथ्यू वेडचा (Matthew Wade Catch) झेल सोडण्याच्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हसन अली पाकिस्तानच्या क्रिकेट वेबसाइट ‘पाकपॅशन’शी बोलताना (Hasan Ali Statement On Matthew Wade Catch) म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरी सामन्यात माझ्या हातून झेल सुटल्यानंतर कित्येक रात्र मला वाईट स्वप्ने पडली होती. मला खूप मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मी संघाला खाली पाडल्यामुळे मला खूप वाईट वाटत होते. मला माहिती नाही की, मी तो झेल कसा आणि का सोडला होता.”
“खासकरून एक व्यक्ती आणि एका संघाच्या रूपात आम्ही क्षेत्ररक्षणाचे खूप कठिण प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे ही चूक पचवणे फारच अवघड होते. पण एका प्रोफेशनल क्रिकेटपटूच्या रूपात मला माहिती आहे की, अशा गोष्टी घडत असतात. यापूर्वीही माझ्याकडून असे काही झेल सुटले आहेत. त्यामुळे हे ठीक आहे,” असेही त्याने म्हटले.
हसन अलीची टी२० विश्वचषकातील कामगिरी
हसन अली हा पाकिस्तान संघाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. या २७ वर्षीय गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४९ सामने खेळताना ६० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी२० विश्वचषक २०२१ मध्ये (T20 World Cup 2021) ६ सामने खेळताना ५ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ससेक्सची पुन्हा घसरगुंडी, पण चेतेश्वर पुजाराने लय ठेवली कायम; द्विशतकानंतर आता ठोकली सेंच्यूरी
‘आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो, पण…’, आरसीबीच्या कर्णधाराने सांगितली कुठे झाली चूक