गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये टी२० विश्वचषक २०२१ चा दुसरा उपांत्य फेरी सामना रंगला होता. सुपर १२ फेरीतील शानदार प्रदर्शनानंतर उपांत्य फेरीत पोहोचलेल्या या संघांसाठी अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. दोन्ही संघातील खेळाडूंनी हा महत्त्वपूर्ण सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज मॅथ्यू वेड याने अंतिम षटकात सामन्याचे चित्र पालटले आणि ऑस्ट्रेलिया संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून देत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या २ षटकात ऑस्ट्रेलिया संघाला २२ धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी हे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव राहिल्यावर स्ट्राईकवर असलेल्या मार्कस स्टॉयनिसने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि मॅथ्यू वेड स्ट्राईकवर आला.
पुढे आफ्रिदीने षटकातील तिसरा चेंडू वाईड टाकल्यामुळे ऑस्ट्रेलियाला जास्तीची एक धाव मिळाली. पुढे याच तिसऱ्या चेंडूवर हसन अलीने झेल सोडल्यामुळे मॅथ्यू वेडला जीवनदान मिळाले. याच जीवनदानाचा फायदा घेत मॅथ्यू वेडने आपल्या बाजूने सामना वळवला. त्याने षटकातील चौथ्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप शॉट ठोकला आणि चेंडू षटकारासाठी गेला. पुढे हीच आक्रमकता कायम ठेवत त्याने डिप मिड विकेटच्या दिशेने ९६ मीटरचा षटकार खेचला.
https://www.instagram.com/reel/CWJP61AIAm7/?utm_source=ig_web_button_share_sheet
शेवटची षटकातील सहावा आणि अखेरचा चेंडूही त्याने फाईन लेगच्या वरुन मारत षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. त्याच्या या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने एक षटक राखून चित्तथरारक विजय मिळवला. आयसीसीने मॅथ्यू वेडच्या त्या सामन्याला कलाटणी देणाऱ्या सलग ३ षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आता टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये होईल. दुबई येथे १४ नोव्हेंबर रोजी हा सामना रंगेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अलीच्या हातून ‘तो’ झेल सुटला अन् कोट्यवधी पाकिस्तानी चाहत्यांचे हृदय तुटले, छोटी मुलेही ढसाढसा रडली
ओ देस मेरे! सकाळी आयसीयूमधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी ‘त्याने’ देशासाठी खेळताना अर्धशतक ठोकले