पुढील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर 12 जानेवारीला संघाची घोषणा करतील. त्यापूर्वी एका खेळाडूनं शानदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारताचा स्टार सलामीवीर मयंक अग्रवाल असं या खेळडूचं नाव आहे.
मयंकनं सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये कहर केला आहे. त्यानं शानदार फलंदाजी करत स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो टीम इंडियात पुनरागमन करु शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी होण्यापूर्वी विजय हजारे ट्रॉफी सुरू झाली, ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये मयंक अग्रवालनं देखील सहभाग घेतला असून स्पर्धेत त्यानं अप्रतिम फलंदाजी केली. मयंकनं 2024-25 च्या विजय हजारे ट्रॉफीच्या 7 डावांत 153.25 च्या सरासरीनं 617 धावा केल्या. यामध्ये त्याच्या बॅटमधून 4 शतकं आली आहेत.
मयंक अग्रवालनं आपल्या स्फोटक फलंदाजीनं भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यानं केलेल्या कामगिरीमुळे शुबमन गिलची जागा धोक्यात येऊ शकते. गिल सध्या फॉर्मसाठी झगडत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. आता मयंक अग्रवालनं उत्कृष्ट कामगिरी करुन निवडकर्त्यांसमोर पेच निर्माण केला आहे. जर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यास भारताला रोहित सोबत नवा सलामीवीर मिळू शकतो.
मयंक अग्रवालनं 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानं टीम इंडियासाठी 21 कसोटी खेळल्या, ज्यामध्ये 41.33 च्या सरासरीनं 1488 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मयंकला केवळ 5 सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने 86 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे खेळणार नाही
या 3 खेळाडूंची चांदी.! वनडे मालिकानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संधी मिळण्याची शक्यता
काय सांगता! कॅच पकडल्यानंतर चाहत्याला 90 लाख रुपयांचे बक्षिस, या स्पर्धेसमोर आयपीएलही फेल!