कोणत्याही फलंदाजासाठी सामन्यात अर्धशतक करणे ही खूप खास बाब असते. याच अर्धशतकाला जर तो शतकात रुपांतरित करू शकला तर त्याच्यासाठी हा क्षण अभिमानास्पद ठरतो. नुकतेच भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल याने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मुंबई कसोटीत शतक झळकावले आहे. त्याचे हे शतक मायदेशातील चौथे शतक असल्याने ते अधिकच खास बनले आहे.
कानपूर कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर मयंकने मुंबई कसोटीतून जोरदार पुनरागमन केले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर मयंक शुबमन गिलसहित भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता. या दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतु ९० धावांवर त्यांची ही भागिदारी मोडली. अजाज पटेलने गिलला ४४ धावांवर बाद करत ही भागिदारी तोडली.
पुढे चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली अशा एकाहून एक सरस फलंदाजांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. परंतु मयंकने मात्र एक बाजू धरून ठेवली आणि चिवट झुंज देत धावांची शंभरी पार केली. ५० व्या षटकातील डॅरिल मिचेलच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत असा चौकार खेचत त्याने शतकाला गवसणी घातली.
हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. या शतकाची विशेषता म्हणजे, हे त्याचे भारतातील पहिले, दुसरे नव्हे तर तब्बल चौथे शतक आहे. त्याचे पहिले कसोटी शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आले होते. २०१९ मध्ये विजाग येथे झालेल्या कसोटीत त्याने हे शतक केले होते. त्यानंतर त्याच मालिकेत पुणे येथील सामन्यात मयंकने दुसरे शतक ठोकले होते. पुढे त्याचवर्षी इंदोर येथे बांगलादेशविरुद्ध त्याने तिसरे कसोटी शतक केले होते. यावरुन मायदेशात मयंकची बॅट तळपते असे, म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
मयंकच्या कसोटीतील कामगिरीची अजून एक खास बाब म्हणजे, भारतात ४ शतके करणाऱ्या मयंकने कसोटीतील सर्व अर्धशतके मात्र भारताबाहेरच आली आहे. त्याने आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत ४ अर्धशतके केली असून त्यातील २ अर्धशतके ऑस्ट्रेलिया, १ अर्धशतक न्यूझीलंड आणि १ वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ लिलावापूर्वी अहमदाबाद आणि लखनऊ संघ ‘या’ ३ खेळाडूंवर खर्च करु शकतात कोट्यावधी रुपये
कोण असेल राजस्थान रॉयल्सचा पुढील कर्णधार? कुमार संगकाराने केला खुलासा
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या जेमिसनचे शुबमनने केले ‘स्वॅग से स्वागत’, ठोकले ३ जबरदस्त चौकार






