आयपीएल 2024 दरम्यान युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव आपल्या वेगामुळे खूप चर्चेत आला होता. त्यानं आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगानं चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता. मात्र हंगामादरम्यान तो दुखापतीचा बळी ठरला, ज्यामुळे त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावं लागलं. आता मयंक यादवबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. मयंक यादव पूर्णपणे तंदुरुस्त दिसत असून त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो.
मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना सातत्यानं 150 किलोमीटर प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती. याशिवाय त्यानं पंजाब किंग्जविरुद्ध 155.8 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकला होता. याच कारणामुळे त्याची खूप चर्चा झाली होती. मात्र, काही सामन्यांनंतर तो दुखापतीचा बळी ठरला.
मयंक यादव रियान पराग आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत बंगळुरूच्या एनसीएमध्ये आपला फिटनेस पुन्हा मिळविण्यात व्यस्त होता. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेत मयंक यादवला संधी दिली जाऊ शकतं.
अहवालात म्हटलं आहे की, “मयंक यादवला गेल्या एक महिन्यापासून दुखापतीची तक्रार नाही. तो एनसीएमध्ये पूर्ण फिटनेससह गोलंदाजी करत आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी किती तयार आहे, हे निवडकर्त्यांना पाहायचंय. भारताचा कसोटी हंगाम मोठा आहे आणि त्यामुळेच निवड समिती बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते. हार्दिक पांड्या जवळपास महिनाभर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. अभिषेक शर्मालाही दर्जेदार सरावाची गरज आहे. मयंक यादव एका दिवसात 20 षटकं गोलंदाजी करत आहे. त्यामुळे बांगलादेश मालिकेसाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकरही बेंगळुरूला येणार आहेत.”
मयंक यादवनं आयपीएल 2024 च्या 4 सामन्यात 7 विकेट घेतल्या होत्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.99 असा उत्कृष्ट राहिला होता. आता मयंक यादवला बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी मिळते की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
मुशीर खानच्या अपघाताबाबत महत्त्वाचं अपडेट, हॉस्पिटलनं जारी केलं पहिलं स्टेटमेंट
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
भारताच्या आणखी एका खेळाडूचा रस्ता अपघात, मोठ्या सामन्यातून बाहेर