---Advertisement---

रोबोटला नाव‌ द्या आणि लंडनला जा, MPL 2025 चाहत्यांसाठी MCA ची ऑफर

On: सोमवार, जून 16, 2025 10:16 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. एमपीएल 2025 दरम्यान मैदानात दिसणाऱ्या रोबोट कुत्र्याला नाव देणाऱ्या चाहत्याला थेट लंडन सफारीची संधी असेल. या स्पर्धेसाठी एमसीएने काही नियमावली जाहीर केली आहे.

सध्या एमपीएल सामन्यांदरम्यान मैदानावर एक रोबोट कुत्रा दिसून येत आहे. अनेक खेळाडू आणि स्वतः एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार हे त्या रोबोटसोबत खेळताना दिसले आहेत. आयपीएलमध्ये अशाच प्रकारचा चंपक नावाचा रोबोट कुत्रा दिसून आलेला. त्याच पार्श्वभूमीवर आता एमसीएने या रोबोटचे नामकरण करणाऱ्या चाहत्याला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या स्पर्धेचा कालावधी 14 जून ते 21 जून यादरम्यान असेल. एमपीएलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरील पहिल्या तीन पिन पोस्टवर रोबोटला देण्यात येणारे नाव कमेंट करायचे आहे. प्रत्येक उमेदवाराला तीन नाव सुचवण्याची मर्यादा असेल. विजेत्याच्या नावाची निवड एमसीए पॅनल करेल. तर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व एमपीएल संबंधित व्यक्तींच्या कुटुंबातील कोणालाही या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. एकापेक्षा जास्त स्पर्धकांनी एकच नाव सुचवल्यास, सर्वात आधी नाव सुचवणाऱ्या स्पर्धकाला विजेता घोषित केले जाईल. विजेत्याचे नाव घोषित झाल्यानंतर, 12 तासांमध्ये उत्तर न मिळाल्यास, दुसरा विजेता घोषित केला जाईल.

विजेत्या स्पर्धकाला भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पहायची संधी मिळेल. विजेत्याच्या सामन्याचे तिकीट, विमान प्रवास व तिथे राहण्याची संपूर्ण सोय एमसीएतर्फे केली जाईल. हा संपूर्ण दौरा तीन रात्र व चार दिवसांचा असेल. दौऱ्यातील इतर खर्च विजेत्याला स्वतः करावे लागतील. या संपूर्ण स्पर्धेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, एमपीएलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरील लिंक ओपन करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---