MPL 2025 सुरू होण्यासाठी आता आठवडाभराचाच अवधी शिल्लक राहिला आहे. जवळपास 18 दिवस ही स्पर्धा चालेल. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेल्या या स्पर्धेसाठी आता पंचांच्या नावाची घोषणा झालेली आहे. एमसीएने बीसीसीआयच्या तब्बल आठ पंचांना या स्पर्धेसाठी पाचारण केले असून, हे सर्व पंच स्पर्धा यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
एमपीएल व डब्ल्यूएमपीएल स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नेतृत्वातील आयोजन कमिटीने एमसीएच्या काही पंचांसह बीसीसीआयच्या एलिट पंचांना देखील स्पर्धेची जबाबदारी दिली आहे. डब्ल्यूएमपीएलच्या काही मुख्य सामन्यांमध्ये देखील हे पंच सेवा देतील.
आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेले अनुभवी पंच विनीत कुलकर्णी (Veenit Kulkarni) यांचे यामध्ये प्रामुख्याने नाव आहे. तसेच, आयपीएल 2025 मध्ये पंचगिरी करण्याचा अनुभव घेतलेले सोलापूरचे अनिश सहस्रबुद्धे (Anish Sahasrabuddhe) हे देखील एमपीएलमध्ये दिसणार आहेत. यासोबतच देशांतर्गत क्रिकेटमधील पंचगिरीचा मोठा अनुभव पाठीशी असलेले स्वरूपानंद कन्नूर हे देखील एमपीएलमध्ये दिसतील.
या तीन अनुभवी पंचांव्यतिरिक्त पराशर जोशी, गणेश चराटे, मुकुंद मंडले, रोहन इंगवले व संदीप चव्हाण हे पंचदेखील एमपीएल दरम्यान आपली सेवा देतील. या सर्व पंचांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी तसेच बीसीसीआयच्या विविध प्रमुख स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे.
MPL व WMPL या दोन्ही स्पर्धां गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. तर, JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्पर्धा पाहता येणार आहेत. तर, स्टार स्पोर्टच्या Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर घरी बसून सामन्यांचा आस्वाद घेता येईल. या दोन्ही स्पर्धांसाठी चाहत्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)






