अर्जेंटिना म्हणजे फुटबॉल विश्वातील दादा संघ. दिगियो मॅरेडोना, गॅब्रियल बटिस्टा आणि आताच्या काळात लिओनेल मेस्सी यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या याच अर्जेंटिना संघाला दिगियो मॅरेडोना यांच्यानंतर गेल्या तब्बल 32 वर्षांपासून विश्वविजेतेपदापासून दूर रहावे लागले आहे.
यापूर्वी 1986 साली अर्जेंटिनाने मॅरेडोना यांच्या एकट्याच्या जीवावर विश्वचषक जिंकला होता.
अर्जेंटिना आजपर्यंत फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत 16 वेळा सहभागी झाला आहे. त्यामध्ये पाच वेळा अंतिम फेरीत पोहचून 1978 आणि 1986 असे दोनवेळा विजेतेपद मिळवले आहे.
2014 साली अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकण्याची संधी होती. मात्र त्यांना जर्मनीकडून 1-0 असा पराभव स्विकारावा लागला होता.
यावेळी अर्जेंटिनाची मदार त्यांचा कर्णधार मेस्सीवर असणार आहे. त्याला सर्जियो अग्यूरो आणि गोंजालो हिगुएन यांची चांगली साथ मिळाली तर अर्जेंटिनाला हा विश्वचषक जिंकन्याची संधी असेल.
समकालीन फुटबालपटूंमध्ये मेस्सीने सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून आपली छाप सोडली आहे. त्याने विक्रमी पाचवेळा फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळवला आहे. त्याचबरोबर पाच वेळा युरोपियन गोल्डन शू मिळवला आहे.
लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लबला एका वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकू शकला नाही. गेल्यावेळी विजेतेपदाच्या जवळ जाऊनही पदरी निराशा पडली.
2005 मध्ये आतंराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण करणाऱ्या मेस्सीने अर्जेंटिनाकडून 124 सामन्यात 64 गोल केले आहेत.
2006, 2010 आणि 2014 असे तीन विश्वचषक मेस्सी खेळला आहे.
रशियामधे होत असलेल्या विश्वचषकात तो चौथ्यांदा सहभागी होतोय. 30 वर्षीय मेस्सीचा कदाचित शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे मेस्सी अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.