इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने शानदार पुनरागमन केले आहे. या हंगामात मुंबईची सुरुवात सलग दोन पराभवाने झाली होती, त्यानंतर त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने पराभव करून मोठा विजय त्यांच्या नावावर केला आणि या हंगामात विजयाचे दरवाजे उघडले. त्यानंतर पुन्हा त्यांना दोन पराभवाचा सामना करावा लागला. पाच सामन्यांमध्ये फक्त एक विजय मुंबईच्या नावावर होता आणि त्यामुळे चाहते नाराज होते. पण आता सलग पाच सामने जिंकून पाच वेळा चॅम्पियन झालेली मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आली आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीच्या पाच सामन्यानंतर ज्या प्रकारे पुनरागमन केले आहे, ते कौतुकास्पद आहे. मुंबई इंडियन्सने रविवारी झालेल्या सामन्यात लखनऊचा 54 धावांनी जोरदार पराभव केला. मुंबई इंडियन्स अजून एक सामना जिंकली तर एकाच हंगामात सलग विजय मिळवण्याच्या विक्रमात ते सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाची बरोबरी करतील.
मुंबईच्या 5 सलग विजयानंतर जे आकडे समोर आले आहेत ते खूप वेगळे आहेत. मुंबई संघाचा एका हंगामात सलग 6 विजयांचा रेकॉर्ड 2008 मध्ये झालं होतं, पण त्या हंगामात या संघाने किताब जिंकला नव्हता आणि प्लेऑफ मध्ये सुद्धा संघ पोहोचला नव्हता. पण त्यानंतर मुंबईने असे पाच हंगाम खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सलग पाच विजय मिळवले आहेत आणि प्रत्येक वेळा अंतिम सामन्यापर्यंत हा संघ पोहोचला आहे.
या पाच हंगामात त्यांनी कमालीचे प्रदर्शन केलं आहे आणि चार वेळा ट्रॉफी जिंकून त्यांचं वर्चस्व कायम ठेवलेल आहे. फक्त एका हंगामात मुंबई 2010 मध्ये उपविजेती ठरली आणि किताब जिंकू शकली नाही. यानंतर 2013, 2015 2017 आणि 2020 असे हंगाम होते, जेव्हा मुंबईने सलग पाच विजय मिळवत ट्रॉफी सुद्धा जिंकली होती.
आता एका हंगामात सलग 5 सामने जिंकून मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 4 संघांमध्ये पोहोचली आहे. संघ उत्तम प्रकारे प्रदर्शन करत आहे, रोहित शर्माने पुनरागमन केले आहे. बुमराह देखिल त्याच्या लयीमध्ये येताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई या हंगामाची ट्रॉफी उचलण्याच्या जवळ जाताना दिसत आहे. पण मुंबईने त्यांच्या खेळामध्ये असेच सातत्य राखणे गरजेचे आहे.
आता प्लेऑफमध्ये जाणाऱ्या संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. मुंबई सध्या तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे 12 गुण आहेत. सध्या टॉपच्या स्थानावर असलेल्या आरसीबी संघाचे 10 सामन्यात 14 गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे ज्यांचे 12 गुण आहेत. तसेच चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.
त्यामुळे मुंबईला जर टॉप 4 मध्ये टिकून राहायचे असेल, तर त्यांनी बाकीच्या सामन्यात देखील शानदार प्रदर्शन करणे गरजेचे आहे. मुंबईची नजर सध्या टॉप 2 मध्ये पोहोचण्यावर असेल. जर मुंबईने त्यांचं जिंकण्याचं सातत्य सुरू ठेवलं तर ते प्लेऑफमध्ये तर पोहोचतीलच पण 2008 च्या हंगामातील सलग विजयांचं बनवलेलं रेकॉर्ड सुद्धा ते मोडतील.





