आज आयपीएल मधील सगळ्यात पारंपरिक आणि बहुप्रतीक्षित लढत दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ या सामन्यात आमनेसामने असतील. यंदाच्या हंगामात चेन्नईने जबरदस्त कामगिरी करत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान सद्यस्थितीत काबीज केले आहे. तर दुसरीकडे सुरुवातीला काहीशी अडखळल्या नंतर मुंबई इंडियन्सची गाडी आता विजयाच्या रूळावर परतताना दिसते आहे.
त्यामुळे आजच्या मुकाबल्यात चुरशीचा खेळ होईल, अशीच चाहत्यांना अपेक्षा आहे. या सामन्याच्या निमित्ताने इतिहासात कोणता संघ कोणावर भारी पडला आहे, आणि मागील हंगामातील या संघांची एकमेकांविरुद्धची आकडेवारी काय आहे, यावर आजच्या या लेखात नजर टाकूया.
मुंबईचे पारडे जड
आत्तापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण ३० सामने खेळवल्या गेले आहेत. यात मुंबईच्या संघाने १८ सामन्यात विजय मिळवला आहे तर चेन्नईला १२ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. मागील पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली तर ती देखील मुंबईच्या बाजूने आहे. मुंबईने मागील पाच सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत तर चेन्नईने एक सामना आपल्या नावे केला आहे.
मागील हंगामाबाबत बोलायचे झाल्यास दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला होता. आयपीएल २०२०च्या प्रारंभीच्या सामन्यातच चेन्नईने मुंबईला ५ गडी राखून मात दिली होती. मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना २० षटकांत ९ बाद १६२ धावा केल्या होत्या. मात्र चेन्नईने हे लक्ष्य ४ चेंडू शिल्लक ठेवून पार केले होते. चेन्नईकडून अंबाती रायडूने ४८ चेंडूत ७१ धावांची खेळी उभारली होती.
दुसर्या सामन्यात मुंबईने घेतला बदला
पहिल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली असली तरी दुसर्या सामन्यात पुनरागमन करत मुंबईने हिशोब चुकता केला होता. दुसर्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करतांना २० षटकांत अवघ्या ९ बाद ११४ धावा केल्या होत्या. ट्रेंट बोल्टने भेदक गोलंदाजी करत १८ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करतांना मुंबईने १० विकेट्सने विजय प्राप्त केला होता. ईशान किशनने सलामीला येत ६८ धावांची खेळी केली होती.
वरील आकडेवारी बघता इतिहास मुंबईच्या बाजूने कौल देत असल्याचे दिसते आहे. मात्र यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ धुवाधार फॉर्मात आहे. त्यामुळे मुंबईला इतिहास कायम राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तर दुसरीकडे चेन्नईला इतिहास बदलण्याच्या दृष्टीने या सामन्यात विजय मिळवून एक पाउल पुढे टाकण्याची संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीने सोडलं, रोहितने घेतलं; आज चेन्नई सुपर किंग्जचं कंबरड मोडणार हा अनुभवी धुरंधर!
खराब फॉर्ममुळे चहलला मिळणार डच्चू? प्रशिक्षकांनी दिले हे उत्तर
विजयाच्या गोडव्यात पंजाब किंग्जसाठी कडवी बातमी, पडीक्कलला बोल्ड करणारा हा गोलंदाज दुखापतग्रस्त