इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक ५ जेतेपद पटकावले आहेत. परंतु आयपीएलच्या १४ व्या हंगामात त्यांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. तर दुसरीकडे युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला ही सुर गवसताना दिसून येत नाहीये. या दोन्ही संघामध्ये आज (२९ एप्रिल ) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये अटीतटीचा सामना पहायला मिळू शकतो. दोन्ही ही संघांनी आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. चला तर पाहूया कशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन.
मुंबई इंडियन्स संघासाठी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक सलामी फलंदाजांची भूमिका पार पाडतील तर इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे मधल्या फळीत महत्वाची भूमिका बजावतील. सूर्यकुमार यादवने गेल्या काही सामन्यांमध्ये संघासाठी धावा केल्या आहेत. परंतु इशान किशन आणि हार्दिक पंड्या पूर्णपणे फ्लॉप ठरत आहेत. त्यामुळे या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच कृणाल पंड्या आणि किरोन पोलार्ड हे अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावतील.
फिरकी गोलंदाज राहुल चाहर या संघाला प्रत्येक सामन्यात गडी बाद करून देत आहे. तसेच फिरकी गोलंदाजी आणखी जोरदार करण्यासाठी जयंत यादवला देखील संघात संधी देण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करणे, राजस्थान रॉयल्स संघाच्या फलंदाजांसाठी कठीण जाऊ शकते.
तसेच या मोठ्या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघामध्ये काही महत्वाचे बदल पहायला मिळू शकतात. सलामी फलंदाजी करण्याची जबाबदारी संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांना देऊ शकतो. तर गोलंदाजी करण्यासाठी संजू सॅमसन, जयदेव उनादकटला संधी देऊ शकतो. तसेच मुस्तफिजुर रेहमान ऐवजी कार्तिक त्यागीला संघात स्थान मिळू शकते. कारण गतवर्षी युएई मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यागीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. यासोबतच अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबे आणि ख्रिस मॉरिस यांचे संघातील स्थान कायम राहील.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन ( कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेविड मिलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी आणि चेतन सकारिया
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चाहर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट