चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ९ वा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने १३ धावांनी विजय मिळवला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे. तर हैदराबादचा या हंगामातील सलग तिसरा पराभव आहे.
मुंबईने १५० धावा करत हैदराबादला १५१ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करता हैदराबादला १९.४ षटकात सर्वबाद १३७ धावाच करता आल्या.
बेअरस्टोच्या आक्रमणानंतर मात्र हैदराबादकडून कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. हैदराबादच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. बेअरस्टो नंतर केवळ वॉर्नरला सर्वाधिक ३६ धावांची खेळी करता आली. मात्र तो १२ व्या षटकात धावबाद झाला. त्याच्यानंतर विराट सिंगने ११ आणि विजय शंकरने २८ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहरने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्य, तर कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ विकेट घेतली.
बेअरस्टोचे आक्रमण
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी एका बाजूने बेअरस्टोने पॉवरप्लेमध्ये जोरदार आक्रमण केले. त्याने ट्रेंट बोल्टने गोलंदाजी केलेल्या तिसऱ्या षटकात ३ चौकार आणि १ षटकारासह तब्बल १८ धावा वसून केल्या. त्यानंतरही त्याच्या बॅटमधून काही आक्रमक फटके आले. त्यामुळे वॉर्नर आणि त्याची ५ षटकांच्या आतच अर्धशतकी भागीदारी झाली.
अखेर बेअरस्टोचे वादळ त्याच्या स्वत:च्या चूकीनेच थांबले. ८ व्या षटकात कृणाल पंड्याच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात त्याचा पाय स्टंपला लागला आणि स्टंपवरील बेल्स पडल्या. त्यामुळे बेअरस्टोला २२ चेंडूत ४३ धावांवर आपली विकेट गमवावी लागली.
त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला मनिष पांडेही ९ व्या षटकात राहुल चाहरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मुंबईच्या १५० धावा
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५० धावा केल्या आणि हैदराबादला १५१ धावांचे आव्हान दिले.
मुंबईने १० षटकात २ विकेट्स गमावल्यानंतरही क्विंटन डी कॉकने चांगली लय कायम ठेवली होती. पण अखेर त्याला ४० धावांवर मुजीब उर रेहमानने बाद केले. त्यापाठोपाठ ईशान किशनही १२ धावांवर मुजीबच्याच गोलंदाजीवर १७ व्या षटकात बाद झाला. त्यानंतर १९ व्या षटकात हार्दिक पंड्या ७ धावा करुन खलील अहमदच्या चेंडूवर बाद झाला.
पण अखेरच्या षटकात किरॉन पोलार्डने २ षटकार ठोकत मुंबईला १५० धावांचा टप्पा गाठून दिला. याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये वैयक्तिक २०० षटकारही पूर्ण केले.
हैदराबादकडून मुजीब उर रेहमान आणि विजय शंकरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर खलील अहमदने १ विकेट घेतली.
रोहित-़डीकॉकची अर्धशतकी भागीदारी
मुंबंईकडून सलामीला फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि क्विटंन डी कॉक उतरले. या दोघांनीही मुंबईला चांगली सुरुवात करुन देताना अर्धशतकी भागीदारी रचली. पण ही भागीदारी रंगत असतानाच विजय शंकरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा विराट सिंगकडे झेल देऊन ३२ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले.
त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाटी उतरलेल्या सुर्यकुमारनेही अश्वासक सुरुवात केली होती. मात्र, १ चौकार आणि १ षटकारासह ६ चेंडूत १० धावा करुन तो ९ व्या षटकात विजय शंकरच्याच चेंडूवर बाद झाला. त्याचा झेल शंकरनेच घेतला. त्याच्यानंतर ईशान किशन डी कॉकची साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
मुंबईने १० षटकांत २ बाद ७५ धावा केल्या.
मुंबईने जिंकली नाणेफेक
या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांचा हा या हंगामातील तिसरा सामना होता. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ११ जणांच्या संघात ऍडम मिल्नेला संधी मिळाली. त्यामुळे त्याचा मुंबईसाठीचा हा पहिलाच सामना होता. त्याला मार्को जेन्सनऐवजी संघात संधी मिळाली.
तसेच हैदराबादने या सामन्यासाठी ४ बदल त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघात केले. हैदराबादने विराट सिंग, अभिषेक शर्मा, मुजिब उर रेहमान आणि खलील अहमद यांना अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली. तर वृद्धिमान साहा, जेसन होल्डर, शाहबाज नदीम आणि टी नटराजन यांना संघातून वगळण्यात आले.
असे आहेत ११ जणांचे संघ –
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चाहर, अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.
सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, विराट सिंग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, मुजीब उर रहमान, खलील अहमद.