वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी नुकतेच एक मोठे वक्तव्य केले आहे. होल्डिंग यांनी स्पष्ट केले आहे की, क्रिकेटमधील वर्णद्वेष हा संपुष्टात येणे जवळ जवळ अशक्य आहे. होल्डिंग यांच्या मते वर्णद्वेषाच्या विरोधात पाठिंबा दर्शविण्यासाठी केवळ गुडघे टेकून नाराजी व्यक्त करणे ही औपचारिकता नसावी. होल्डिंग हे मूळचे आफ्रिकन असलेले अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त स्काय स्पोर्ट्सचा कार्यक्रम ‘क्रिकेट शो’ मध्ये बोलत होते.
फ्लॉयड यांचा मृत्यू गेल्या वर्षी मिनेसोटा येथे एका श्वेतवर्णीय पोलिस कर्मचाऱ्याच्या हातून झाला होता. इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन आणि आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू इबनी रेनफोर्ड ब्रेंट यांच्याशी झालेल्या चर्चेत होल्डिंग म्हणाले की, “वर्णद्वेष नेहमीच राहील, वर्णभेद करणारे नेहमीच असतील. वर्णभेदापासून पूर्णपणे मुक्ती मिळवणे हे असे म्हणण्यासारखे असेल की आपण गुन्ह्यापासून पूर्णपणे मुक्त झालो. हे अशक्य आहे.”
होल्डिंग म्हणाले, “तुमच्या समाजात जितके कमी गुन्हे घडतील, समाजात वर्णद्वेषाच्या घटना जितक्या कमी होतील, तितकेच जग अधिक चांगले व सुंदर होईल.” होल्डिंग म्हणाले की, वर्णद्वेषाला विरोध म्हणून गुडघ्यावर बसणे हे केवळ औपचारिक असू नये, तर ते मानसिक असावे. होल्डिंग पुढे म्हणाले, “मी लोकांना सांगणार नाही की त्यांनी त्यांच्या गुडघ्यावर बसावे. लोकांना काय करावे हे सांगण्यासाठी मी येथे आलो नाही.”
होल्डिंग यांच्या मते कृष्णवर्णीय लोक त्यांच्या आयुष्यात ज्या आव्हानांना तोंड देतात त्या समस्या प्रत्येकजण समजू शकत नाही. ते म्हणाले, “आपल्या संपूर्ण आयुष्यात अशा प्रकारच्या दबावाखाली राहणे म्हणजे काय आहे, हे लोकांना समजणार नाही. काही लोक सहज बोलतात आणि त्यांना हे देखील माहित नसते की याचा कृष्णवर्णीय लोकांवर काय प्रभाव पडतो. त्यांना असे म्हणायची सवय झाली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक २०२३ मध्ये कोण असेल भारतीय संघाचा फिनिशर? या खेळाडूंचा आहे पर्याय
इंग्लंड दौऱ्यावर यशस्वी होण्यासाठी विश्वविजेत्या कर्णधाराने रिषभ पंतला दिला हा कानमंत्र
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा