ऑस्ट्रेलिया दौर्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील दुसर्या डावात भारतीय फलंदाजी अवघ्या ३६ धावांवर गुंडाळली गेली. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दोन्ही डावात सपशेल अपयशी ठरला.
दोन्ही डावात एकाच पद्धतीने बाद झाल्याने त्याच्या तंत्रातील दोष उघडे पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. अनेकांनी त्याला दुसर्या कसोटी सामन्यात संधी देऊ नये असेही मत व्यक्त केले. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी पृथ्वीच्या समर्थनासाठी धावून आला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने पृथ्वीवर अजून थोडा विश्वास दाखवण्याची गरज असल्याचे मत, हसीने मांडले आहे.
जो बर्न्सचे दिले उदाहरण
संघ व्यवस्थापनाने पृथ्वीच्या पाठीशी उभी राहण्याची हीच वेळ आहे असे सांगत हसी म्हणाला, “पृथ्वीने अॅडलेड कसोटीत धावा काढल्या नाहीत. मात्र तिथली खेळपट्टी आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी निश्चितच अधिक आव्हानात्मक होती, हेदेखील आपण लक्षात घ्यायला हवे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जो बर्न्स देखील सध्या खराब फॉर्म मध्ये आहे. मात्र ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पहिल्या डावात तो अपयशी ठरला, मात्र दुसर्या डावात त्याने अर्धशतक झळकावत फॉर्म परत मिळविला. त्याचा आत्मविश्वास या खेळीने नक्कीच उंचावला असेल. भारतीय संघ व्यवस्थापनाने याचेच अनुकरण करत पृथ्वीला अजून एक संधी देण्याची गरज आहे.”
मेलबर्नची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल
पृथ्वी शॉला मेलबर्नच्या खेळपट्टीवर फॉर्मात परत यायची नामी संधी असेल, असेही मत मायकेल हसीने व्यक्त केले. “मेलबर्नच्या खेळपट्टीवर अॅडलेडच्या खेळपट्टीसारखी उसळी आणि वेग नक्कीच नसेल. मेलबर्नची खेळपट्टी फलंदाजांना साथ देईल असा अंदाज आहे. पृथ्वी शॉमध्ये प्रतिभा आहे, आणि त्यामुळे तो या संधीचा नक्कीच फायदा घेईल. त्याला संघात कायम ठेवल्याने इतर खेळाडूंना देखील एक सकारात्मक संदेश दिल्या जाईल. एका कसोटी सामन्यात तुम्ही खराब कामगिरी केली, तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा विश्वास यामुळे संघ व्यवस्थापन खेळाडूंना देऊ शकेल. खेळाडूंना आपली उमेद कायम राखण्यासाठी हा पाठिंबा गरजेचा असतो”, असेही हसी पुढे म्हणाला.
२६ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्याला येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर सुरुवात होईल. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतणार असल्याने उर्वरित सामन्यात अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. कोहली शिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील हाताच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करण्याचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.
महत्वाच्या बातम्या:
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– गुलाबी चेंडू नकोच! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाजाचा गुलाबी चेंडूला विरोध
– अबब! ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीनला मिळाली इतकी किंमत