भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्यांत अनेकदा रोमांच पाहायला मिळाला आहे. या दोन संघांकडे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून जरी पाहिले जात नसले तरी दोन्ही संघांनी नेहमीच एकमेकांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. आता हे दोन संघ पहिल्या-वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघाबद्दल विविध प्रतिक्रिया क्रिकेट जगतातून ऐकायला मिळत आहेत. नुकतेच इंग्लंडचे दिग्गज कर्णधार मायकल वॉन यांनी जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्याबद्दल भाष्य केले आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साऊथॅम्पटन येथे १८ ते २२ जून दरम्यान रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांची तयारी सुरु झाली आहे.
बुमराह की बोल्ट?
आयपीएलमध्ये बुमराह आणि बोल्ट हे वेगवान गोलंदाज जरी एकत्र खेळत असले तरी कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोघे आमने-सामने आलेले दिसून येणार आहेत. बुमराह भारतासाठी तर बोल्ट न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा वेगवान गोलंदाज असणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील उत्तम गोलंदाजाची निवड करणे कठीण असल्याचे वॉन यांनीही मान्य केले.
स्पार्क स्पोर्ट्सशी बोलताना वॉन म्हणाले, ‘बुमराह की बोल्ट… मी निर्णय घेऊ शकत नाही. मी कदाचीत आयुष्यात पहिल्यांदाच असं म्हणत असेल. मी बोल्टचे नाव घेईल कारण तो बराच काळापासून खेळत आहे, पण बुमराहसुद्धा शानदार आणि उत्कृष्ट शैली असलेला गोलंदाज आहे. त्याने काहीवर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे मला वाटते अटीतटीची स्पर्धा असेल.’
अशी आहे बुमराह-बोल्टची कसोटी कामगिरी
बुमराहने २०१८ साली कसोटीत पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत १९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २२.१० च्या सरासरीने ८३ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, त्याने ५ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
तसेच बोल्टने न्यूझीलंडकडून २०११ साली कसोटीत पदार्पण केले आहे. तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत ७१ कसोटी सामने खेळले असून २८.०२ च्या सरासरीने २८१ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने एक वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची तर ८ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
साऊथम्पटनच्या एकाच हॉटेलमध्ये पुरुष संघासह महिला संघ राहणार विलगीकरणात, ‘हे’ आहे कारण
खूप साऱ्या भाज्या ते डोसा, ‘रनमशीन’ विराट कोहलीचा कसा असतो डाएट, घ्या जाणून
व्हिडिओ : चेंडूने घेतली ९० अंशाची फिरकी, फलंदाज झाला क्लीन बोल्ड