दिल्ली | भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशने भारतावर 7 गडी राखून विजय मिळवला. हा सामना रविवारी, 3 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडीयमवर झाला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा केल्या आणि बांगलादेशला विजयासाठी 149 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान बांगलादेशने मुशफिकुर रहिमने केलेल्या 60 धावांच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19.3 षटकात सहज पार केले.
या सामन्यातील भारताच्या पराभवासाठी भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीच्या डीआरएस निर्णयाला जबाबदार ठरविले.
रोहित म्हणाला, ‘बांगलादेशला विजयाचे श्रेय जाते. कारण जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सुरूवातीपासून दबावात ठेवले. हे बचावात्मक लक्ष्य होते पण आम्ही मैदानावर काही चुका केल्या आमच्या खेळाडुंमध्ये अनुभवाची कमी आहे, ते यातून शिकतील आणि आशा आहे पुढच्या सामन्यात ते या चुका करणार नाही.’
‘रिव्ह्यू घेऊन आम्ही एक चुक केली, बांगलादेशच्या त्या फलंदाजाने पहिला चेंडू बॅकफूटवर खेळला होता. आम्हाला वाटले तेव्हा चेंडू बाहेर जात होता. पण त्याने पुढचा चेंडू फ्रंटफुट खेळला पण आम्ही विसरलो होतो की तो चेंडू किती शॉर्ट होता.’
याबरोबरच चहलच्या गोलंदाजीचे कौतुक करताना रोहित म्हणाला, ‘क्रिकेटच्या या स्वरुपामध्ये चहलची नेहमीच चांगली कामगिरी झाली आहे. तो या संघासाठी महत्वपूर्ण आहे आणि फलंदाज सेट होत असताना मधल्या षटकात तो किती महत्वाचा आहे हे त्याने दाखवून दिले आहे.’
चहलने या सामन्यात 4 षटकांत 24 धावा देऊन एक गडी बाद केला.
बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.