दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाने आठ गडी राखून सामना जिंकला. नाबाद ७७ धावा करणाऱ्या मिशेल मार्शने या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या सामन्यानंतर मार्शने त्याच्या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूझीलंड संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याबाबत मार्शने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मैदानावर जाऊन स्वत:ला सिद्ध करायचे होते, असे त्याने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ५० चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी केली होती आणि त्याला त्याच्या याच खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मार्शने या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात येताच आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने आपले खाते उघडले आणि त्यानंतर दरदार अर्धशतकासह संघाला विजय मिळवून दिला होता.
सामन्यानंतर मार्शने ऍडम मिल्नेविरुद्ध लगावलेल्या पहिल्या षटकारावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला मैदानावर जाताच माझ्या उपस्थितीची जाणीव करून द्यायची होती. मार्कस स्टॉयनिस मला नेहमी कोणत्याही स्पर्धेत योगदान देण्यास सांगतो.”
मिशेल मार्शला ऑस्ट्रेलियन संघात वारंवार संधी देण्यात आल्या. स्टीव्ह स्मिथ असूनही त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवण्यात आले आणि त्यानेही संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. संघाला त्याची सर्वात जास्त गरज असताना तो संघासाठी धावून आला आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.
याबाबत मार्श म्हणाला, “कोचिंग स्टाफने वेस्ट इंडिजमध्ये मला सांगितले होते की, मी विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेन. सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला.”
न्यूझीलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषक जिंकला. प्रथम खेळताना, कर्णधार केन विल्यमसनच्या ८५ धावांच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात चार गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलिया संघाने १९ व्या षटकात अवघ्या दोन गडी गमावून ऐतिहासिक विजय संपादन केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लग्न करायचे होते, तर युसूफ पठाणशी करायचे’, जेव्हा सानिया मिर्झाला कवितेतून मिळाला होता अजब सल्ला
टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल न्यूझीलंडचे अभिनंदन? ‘या’ भारतीय क्रिकेटरने ट्वीटमध्ये केली मोठी गडबड