भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-० ने विजय मिळवला. ही मालिका सुरू होण्यापूर्वी केन विलियम्सनने माघार घेतली होती. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यात संघाचे नेतृत्व टीम साऊदीने केले, तर तिसऱ्या सामन्यात संघाचे कर्णधारपद मिचेल सॅंटेनरच्या हाती देण्यात आले होते. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाला ७३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर मिचेल सॅंटेनरने पराभवाचे नेमके कारण काय? याबाबत खुलासा केला आहे.
सामना झाल्यानंतर मिचेल सॅंटेनरने म्हटले की, ” भारतीय संघाने खरोखर खूप चांगली कामगिरी केली. त्यांनी सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली, ज्याचे श्रेय त्यांना जाते. आमच्या संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आमचा सामना भारताच्या एका चांगल्या संघासोबत होता. भारतीय संघाला त्यांच्या देशात जाऊन पराभूत करणे कठीण आहे, हे या मालिकेतून दिसून आले.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “केन (विलियमसन) हा महान फलंदाज आहे, आम्हाला त्याची उणीव जाणवली. आता कसोटी सामने आहेत आणि इतर खेळाडूंना संधी मिळेल, पण भारताला हरवणे खूप अवघड आहे.”
तसेच तिसऱ्या टी२० सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला की, “मी आता फलंदाजाच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. खेळपट्टी वरून मला मदत मिळत होती, त्यामुळे मी चेंडू फिरवत होतो. या वर्षी मी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयपीएल स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केली. आता माझे लक्ष कसोटी मालिकेवर आहे.”
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १८४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव १११ धावांवर संपुष्टात आला आणि भारतीय संघाने हा सामना ७३ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितची टॉस जिंकण्याची हॅट्रिक अन् नेटकऱ्यांनी विराटवर साधला निशाणा, भन्नाट मीम्स व्हायरल
हार्दिक पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार का? महत्त्वाची माहिती आली समोर