ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून जरी बरा झाला असला तरी मेलबर्न इथे बॉक्सिंग डेला (२६ डिसेंबर) सुरु होणाऱ्या चौथ्या ॲशेस सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्टार्कला तळपायाची दुखापत झाली होती. त्याने ही दुखापत असतानाही तिसऱ्या सामन्यात गोलंदाजी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लड विरुद्ध १ डाव आणि ४१ धावांनी विजय मिळवून ॲशेस मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आज सिडनी मध्ये त्याच्या दुखापतीची तपासणी झाली. यात तो दुखापतीतून बारा झाला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे. पण त्याच्या पायातील थकवा अजूनही असल्याचे म्हटले आहे. तसेच तो संघासोबत चौथ्या सामन्यासाठी मेलबर्नला जाणार आहे.
असे असले तरी त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे त्यामुळे त्याच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून जॅक्सन बर्डला संधी मिळण्याची शक्यता आहे.
स्टार्कने या ॲशेस मालिकेत आत्तापर्यंत झालेल्या ३ सामन्यात सर्वाधिक १९ बळी घेतले आहेत. तसेच त्याने तिसऱ्या सामन्यात जेम्स विन्सला बाद केलेला चेंडू त्याचा या शतकातील सर्वोत्तम चेंडू असल्याचे बोलले गेले होते.
ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर बोलताना म्हणाला, ” आम्हाला ५-० ने जिंकायला आवडेल आणि या मालिकेतील प्रत्येक सामन्यात हे तीन (स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड) महत्वाचे गोलंदाज हवे आहेत.”
तसेच स्मिथ पुढे म्हणाला, “पण आम्हाला या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा महत्वाचा दौरा करायचा आहे. ज्यात आम्हाला स्टार्क उपलब्ध असायला हवा.”
याबरोबरच बीबीसीने सांगितल्याप्रमाणे इंग्लंड गोलंदाज क्रेग ओव्हरटोन याच्याही चौथ्या सामन्यातील खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे आहे. त्याला कमिन्सने टाकलेला उसळता चेंडू छातीला लागला होता.