भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलला अधिक महत्त्व देत असल्याचे म्हटले जाते. आता याच गोष्टीला धरून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे अनेक जण त्याचे कौतुक करत आहेत.
स्टार्क हा ऑस्ट्रेलियन वेगवान मारतील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला तितकी प्रभावी कामगिरी करता आली नसली तरी, पहिल्या डावात विराट कोहली व दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे या दोन्ही महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने बाद केले. या विजेतेपदा बरोबरच आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंपैकी तो एक बनला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या या यशाविषयी बोलताना तो म्हणाला,
“मला असे वाटते की पैसा येतो आणि जातो. मात्र ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. शंभर वर्षापेक्षा जास्तच्या काळात ऑस्ट्रेलियासाठी 500 पेक्षा कमी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. ही गोष्टच उत्साह वाढवते. त्यामुळे आयपीएलमधून पैसे मिळणार नसतील तर ही गोष्ट मला तितकीशी दुःखद वाटत नाही.”
स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी वनडे विश्वचषक, टी20 विश्वचषक व आता जागतिक कसोटी अजिंक्यपद या तीनही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तो अखेरच्या वेळी 2014 मध्ये आयपीएल खेळला होता. त्यानंतर 2018 मध्ये केकेआर संघाने त्याला आपल्या संघात सामील करून घेतलेले. मात्र, दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने आयपीएल लिलावात आपले नाव दिले नाही.
(Mitchell Starc Speaks On He Is Not Playing IPL)
महत्वाच्या बातम्या –
‘भारतीय फलंदाजांना बाबर आझमकडून शिकण्याची गरज…’, पराभवानंतर माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान
आयपीएलमधील 3 स्टार्सचे नशीब फळफळले! दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकाकडे कॅप्टन्सी, तर दोघांना संघात एन्ट्री