भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली. इतर खेळाडू धावांसाठी संघर्ष करत असतानाच रहाणेने खंबीरपणे किल्ला लढवला. पहिल्या डावात रहाणेने अर्धशतक झळकावले होते, पण दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. तो यावेळी स्वत:ही निराश झाला आणि चाहत्यांनाही निराश केले. रहाणे यादरम्यान खास विक्रम रचण्यापासून मुकला.
झाले असे की, भारताच्या दुसऱ्या डावातील 57वे षटक ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क (Mitchell Starc) टाकत होता. यावेळी कमिन्सच्या पहिल्या चेंडूवर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने धाव घेतली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर रहाणेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅटची कड घेत चेंडू थेट यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरे याच्या हातात गेला. त्यामुळे भारतीय संघाला रहाणेच्या विकेट्सच्या रूपात मोठा धक्का बसला.
दुसऱ्या डावात रहाणे 108 चेंडू खेळून 46 धावांवर तंबूत परतला. त्याने या धावा करताना 7 चौकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहली (Virat Kohli) यानेही 49 धावांचे योगदान दिले. तसेच, सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हादेखील 43 धावा करून तंबूत परतला.
रहाणे विक्रमाला मुकला
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रहाणे 46 धावांवर तंबूत परतताच मोठ्या विक्रमाला मुकला. त्याने पहिल्या डावात 129 चेंडूंचा सामना करताना 89 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 11 चौकार मारले होते. जर रहाणेने सलग दुसऱ्या डावात अर्धशतक केले असते, तर तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला असता.
त्याने पहिल्या डावात 89 धावांची खेळी करत डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय बनण्याचा मान मिळवला होता.
भारतापुढे 444 धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केल्यानंतर भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवशीच्या 58व्या षटकापर्यंत भारताने 7 विकेट्स गमावल्या. आता इथून पुढे भारत विजय मिळवू शकतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (mitchell starc takes ajinkya rahanes wicket wtc final)
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या मते कॅमरून ग्रीनने शानदार झेल पकडला’, वादग्रस्त निर्णयावर भारतीय दिग्गजाची खळबळजनक प्रतिक्रिया
“देशासाठी खेळतोय हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा”, विराट झाला भावूक