मिताली राजने बुधवारी महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की मितालीला लहानपणी क्रिकेट खेळण्यास काडीमात्र रस नव्हता तुम्हाला ते खरे वाटेल का? परंतु हे खरे आहे. सध्या भारतीय महिला संघाची कर्णधार असलेली मिताली राज लहानपणी भरतनाट्य करण्यात रमायची. एवढेच नाही तर तिने लहानपणी याचे शिक्षणही घेतले आहे.
वयाच्या १०व्या वर्षापासून मितालीने क्रिकेट खेळणे चालू केले, ज्योती प्रसाद ज्या की स्वतः एक महिला क्रिकेटपटू होत्या त्यांनी मितालीमधील क्रिकेट खेळण्याची प्रतिभा ओळखली आणि भारताला आणखीन एक क्रिकेटमधील रत्न मिळाले.
मितालीला लहानपणी एक नृत्यांगना होण्याची इच्छा होती, पण नशिबाच्या मर्जीत काही औरच होते. मितालीच्या वडिलांनी तिला सेंट जॉन्स कोचिंग कॅम्पस जे की सिकंदराबादमध्ये होत तेथे भरती केले. तेव्हा मिताली फक्त १० वर्षाची होती.
मितालीचे वडील, दोराय राज म्हणाले, ” ती लहानपणी खूप उशिरापर्यंत झोपायची, ती सकाळी लवकर उठावी म्हणून मी तिला क्रिकेट कॅम्पला घेऊन जायचो जेथे माझा मुलगा पण शिकत होता. माझी मैत्रीण ज्योती प्रसादने मितालीमधील प्रतिभा ओळखली. काही महिन्यांनंतर तिने मला मितालीच्या क्रिकेटवर जास्त भर देण्यास सांगितले. मग तिथून मितालीच क्रिकेट चालू झालं.”
” सेंट जॉन्स कोचिंग कॅम्प हा फक्त मुलांसाठी असल्यामुळे मितालीला तो सोडावा लागला. ज्योती प्रसाद यांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला केएस शाळेतील संपत कुमार यांच्याकडे घेऊन गेलो. संपत सर खूप शिस्त प्रिय होते. जवळ जवळ एका वर्षानंतर सरांनी मला बोलवले आणि सांगितले की मिताली भारताकडून तर क्रिकेट खळेलच पण ती सर्व विक्रमे ही मोडेल. मला तेव्हा त्यांच्या बोलण्यावर एवढा विश्वास बसला नाही पण नंतर मला कळाले की मितालीमध्ये किती प्रतिभा आहे. ” असे ते म्हणाले.
आज या प्रतिभावान खेळाडूच्या नावावर महिला क्रिकेटमध्ये १८३ सामन्यांत ३०२८ धावा असून तिची सरासरी आहे ५१.५२. यात तिच्या ४९ अर्धशतकांचा आणि ५ शतकांचा समावेश आहे.