मंगळवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिने तिचे स्थान कायम राखले आहे. ती पहिल्या क्रमांकावर कायम आहे. या यादीमध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी मितालीला दक्षिण अफ्रिकेच्या लिजेली ली हिने चांगलेच आव्हान दिले. तिने यादीमध्ये मोठे अंतर पार करत मितालीसोबत संयुक्तपणे पहिले स्थान मिळवेले आहे. लिजेलीचे पाॅईंट्सही मिताली एवढेच आहेत. दोघी ७६२ पाॅईंट्ससह पहिल्या स्थानावर आहेत. मिताली १६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रथम क्रमांकावर विराजमान झाली होती.
महिला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने यावर्षी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चांगले प्रदर्शन केले होते. तिच्या या प्रदर्शनाच्या जोरावर तिने या यादीत पहिले स्थान मिळवले होते. तिने तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदा २००५ मध्ये एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांक गाठला होता, जेव्हा तिने आयसीसी महिला विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ९१ धावांची खेळी केली होती.
दुसरीकडे मितालीसोबत पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या लिजेली लीने वेस्टइंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला आहे. तिने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद ९१ धावा केल्या. तिने तिच्या या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीमध्ये मितालीसोबत प्रथम क्रमांक गाठला आहे.
— ICC (@ICC) September 14, 2021
भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना ७०१ पाॅईंट्ससह नवव्या क्रमांकावर कायम आहे. मिताली आणि मंधाना या दोघीच भारतीय खेळाडू आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये प्रथम १० मध्ये आहेत. तसेच लिजेली लीची संघातील सहकारी आणि गोलंदाज अयोबोगना खाका यादीत एका क्रमांकाने वर सरकली असून सातव्या क्रमांकावर पोहचली आहे.
टी२० क्रमवारीत, इंग्लंडची सारा ग्लेंन गोलंदाजांच्या यादीत दुसरा स्थानावर पोहोचली आहे. इंग्लंडने नुकतीच न्यूझीलँडविरुद्धची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. न्यूझीलँडची लेह कोस्पेरेक, जिने २ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या आणि मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली होती. ती ७ क्रमांकाने वर सरकली असून १५ व्या स्थानावर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मॅंचेस्टर कसोटी मुद्द्यावर अखेर झुकली ईसीबी? बीसीसीआयशी करू शकते चर्चा
फक्त एकच असा व्यक्ती आहे, जो कोहलीला कॅप्टन्सीवरुन हटवू शकतो; माजी क्रिकेटरने सांगितले नाव
टी२० विश्वचषकात रथी-महारथी प्रशिक्षकांना भारतीय म्हणून एकटे शास्त्री गुरुजीच देणार टक्कर