भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत आपला दबदबा कायम ठेवताना दुसऱ्या टी २० सामन्यातही दक्षिण आफ्रिका महिला संघाला ९ विकेट्सने मात दिली आहे.त्यामुळे या ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत भारतीय महिला संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. आज भारताच्या सलामीवीर फलंदाज मिताली राज आणि स्म्रिती मानधना या दोघींनी शानदार अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी २० षटकात १४३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मानधना आणि मिताली या दोघींनी दमदार सुरवात केली. यांनी सलामीलाच शतकी भागीदारी रचल्याने भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
मागील सामन्यातही अर्धशतकी खेळी करणारी मितालीने आजही तशीच कामगिरी केली. तिने ८ चौकारांच्या साहाय्याने ६१ चेंडूत ७१ धावांची आक्रमक खेळी केली. तिला भक्कम साथ देणाऱ्या स्म्रितीने आजही आक्रमक खेळ केला. तिने ४२ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. यात तिने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. पण तिची ही दमदार खेळी मोसॅलिने डॅनिएल्सने तिला पायचीत करून संपुष्टात आणली.
त्यानंतर मिताली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने(७*) आणखी पडझड होऊ न देता भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ७ बाद १४२ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून सून लूस(३३) आणि नादिन डे क्लर्कने(२६) चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ४३ धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील हीच सर्वाधिक धावांची भागीदारी होती.
सून लूस आणि डे क्लर्क बाद झाल्यानंतर अखेरच्या काही षटकात क्लो ट्रायऑन(१५) आणि शबनीम इस्माइल(१६*) यांनी आक्रमक खेळ केला. परंतु बाकी फलंदाजांना काही खास करता आले नाही.
बाकी फलंदाजांपैकी लिझेल ली(१५), कर्णधार डेन व्हॅन निएकर्क(१५), मिग्नॉन द्यू प्रीझ(११), मॅरिझन कॅपनेही(२) आणि आयबॉन्ग खाका(१*) यांनी धावा केल्या.
भारताकडून अनुजा पाटील(२/३७), पूनम यादव(२/१८), पूजा वस्त्रकार(१/३०) आणि शिखा पांडे (१/२६) यांनी विकेट्स घेतल्या.






