इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना मोठमोठ्या दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळते. परंतु जो खेळाडू दडपणाखाली न खेळता कामगिरी करतो तोच खेळाडू आपल्या संधीचे सोने करतो. अशीच काहीसी कामगिरी आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अष्टपैलू हर्षल पटेल याने केली.
मुंबईचे फलंदाज चांगल्या मजबूत आघाडी घेण्याच्या स्थितीत असताना बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने 16 व्या षटकात चेंडू हर्षलच्या हाती सोपवला. त्यावेळेस रोहितच्या संघाची स्थिती 3 बाद 128 अशी होती. त्यामध्ये मुंबई संघाचे विस्फोटक फलंदाज ईशान किशन आणि हार्दिक पांड्या खेळपट्टीवर होते आणि कायरन पोलार्ड खेळायचा बाकी होता. सर्वाना वाटले होते की मुंबई 180-190 धावा सहजपणे करेल. पण हर्षलने मुंबईच्या या अपेक्षांवर पाणी फेरले आणि शेवटच्या चार षटकात मुंबईचे पाच फलंदाज बाद केले. एवढेच नव्हे तर विजयी धावा करून संघाला पहिला सामनाही जिंकून दिला.
सामना विजयानंतर या क्रिकेटपटूने सांगितले की, “शेवटच्या काही षटकांत चेंडू बॅटवर थांबून येत असल्याने कशाप्रकारे गोलंदाजी करायची याची मला कल्पना आली होती. हीच माझी ताकद असल्याने मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आपण नेहमीच विरोधी खेळांडूंकडे पाहून नाही, तर कधीकधी आपल्याला आपली योजना आखून खेळी करावी लागते.”
हर्षलला शेवटच्या दोन षटकांत गोलंदाजी करायची हे त्याला सुरुवातीपासूनच माहित होते. परंतु त्याला तीन षटके करण्याची संधी मिळाली हे एकप्रकारे चांगलेच झाले. तो म्हणाला की, “मी जवळपास 100 टी -20 सामने खेळले आहेत, परंतु प्रथमच एका सामन्यात 5 बळी घेतले आहेत आणि ही कामगिरी मुंबईच्या विरोधात आली असल्याने मला अधिक आनंद वाटत आहे.”
चेन्नई खेळपट्टीच्या प्रश्नावर तो म्हणाला की, “चेन्नईची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. मैदानाचा आकार असा होता त्यामध्ये गोलंदाजीमध्ये विविधता आणि विशेष करून कमी गतीच्या गोलंदाजांना अधिक सफलता मिळवण्यास सोपे जात होते.”
गुजरातमध्ये जन्मलेल्या या खेळाडूंने 2009 मध्ये वरिष्ठ पातळीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये त्याने 64 प्रथम श्रेणी, 57 अ गटातील आणि 97 टी -20 सामने खेळले आहेत. सानंदमध्ये जन्मलेल्या या खेळाडूला गुजरात संघात स्थान मिळत नव्हते, त्यामुळे ते हरियाणामध्ये गेला. तिथे सध्या तो हरियाणा संघाचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-