आयपीएल स्पर्धेत प्रत्येक हंगामात वेगवेगळे टॅलेंट मिळतच असतात. आता आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा एक खेळाडू दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत आहे. गुरुवार गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये कामिंदु मेंडीसने आयपीएलमध्ये पदार्पण केल आहे. याआधी तो दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत होता. आता आयपीएल स्पर्धेतही त्याने त्याचं कौशल्य दाखवून दिलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने एकाच सामन्यात एकाच षटकात दोन वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे.
श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिसने केकेआर विरुद्ध सामन्यात उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांनी गोलंदाजी केली. कोलकाताच्या डावातील बाराव्या षटकात तो गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा केकेआरसाठी अंगकुश रघुवंशी आणि व्यंकटेश अय्यर खेळत होते. जेव्हा रघुवंशी खेळत होता तेव्हा, मेंडिसने उजव्या हाताने गोलंदाजी केली. तसेच पुढच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरच्या वेळेस त्याने गोलंदाजीचा अँगल तर बदललाच, पण डाव्या हाताने गोलंदाजी करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
मागच्या हंगामात जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका मध्ये टी20 मालिका खेळली गेली होती, त्यावेळी टीम इंडिया विरुद्ध सामन्यात मेंडिसने सूर्यकुमार यादवला उजव्या हाताने गोलंदाजी केली होती. तसेच जेव्हा रिंकू सिंग खेळत होता, तेव्हा त्याने डाव्या हाताने गोलंदाजी करायला सुरुवात केली होती.
आयसीसीचा नियम सांगतो की, जर कोणता गोलंदाज दोन्ही हातांनी गोलंदाजी करत असेल तर त्याने आधी अंपायरला ही माहिती देणे गरजेचे असते. तसेच जो फलंदाज स्ट्राइकवर खेळत असेल त्यालाही हे माहीत असले पाहिजे की गोलंदाज कोणत्या हाताने चेंडू टाकणार आहे. जर गोलंदाज अंपायरला न सांगता दुसऱ्या हाताने गोलंदाजी करत असेल तर त्या चेंडूला नो- बॉल म्हणून घोषित केले जाईल.