पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने चमकदार कामगिरी करत वेस्टइंडिजला 109 धावांनी नमवले. हा सामना जमैकाच्या सबिना पार्क येथे पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने आपल्या गोलंदाजांच्या बळावर मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले. दरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बास याने मोठा विक्रम केला आहे.
शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद अब्बासच्या धारदार गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज चाचपडताना दिसले. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ त्यांच्या पहिल्या डावात 150 धावांवर गुंडाळला गेला. बोनर (37 धावा), ब्लॅकवुड (33 धावा) आणि जेसन होल्डर (26 धावा) यांनी पहिल्या डावात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. या डावात शाहीनने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना 51 धावा देऊन 6 बळी मिळवले. याशिवाय मोहम्मद अब्बासने 44 धावा देऊन 3 बळी घेतले.
पाकिस्तानने पहिल्या डावात 302 धावा केल्या होत्या, ज्याच्या आधारावर त्यांना 152 धावांची आघाडी मिळाली होती. चौथ्या दिवशी पाकिस्तानने आपला दुसरा डाव सहा गडी गमावत 176 वर घोषित केला आणि वेस्ट इंडिजपुढे 329 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने एक गडी गमावून 49 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी पुढे खेळतांना वेस्ट इंडिजने लवकरच आपले चार गडी गमावले. केली मेयर्स आणि जेसन होल्डर यांनी सातव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करत काही काळ संघर्ष केला. पण आफ्रिदीने त्याला चालते केले. 328 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 219 धावांवर गारद झाला.
दरम्यान पाकिस्तानचा 6 फूट 1 इंच उंच वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने 44 धावा देऊन तीन बळी घेतले. एका क्षणी तो हॅट्रिक घेण्याच्या अगदी जवळ होता. त्याने 38 व्या षटकात पाचव्या चेंडूवर बॉनर आणि सहाव्या चेंडूवर मायर्सला बाद केले होते. मात्र थोडक्यात त्याची हॅट्रिक हुकली. असे असले तरीही, त्याने मोठा विक्रम केला आहे.
या 3 विकेट्सह मोहम्मद अब्बासने 25 कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्यामध्ये मोहम्मद शमी आणि झहीर खानला मागे टाकले आहे. मोहम्मद अब्बासने आत्तापर्यंत 25 कसोटी सामने खेळत 90 विकेट्स घेतल्या आहेत. 25 कसोटीनंतर शमीच्या नावावर 86 तर झहीरच्या नावावर 77 विकेट्स होत्या. इंग्लंडच्या बर्न्सच्या नावावर 25 कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे. त्याने सर्वाधिक 167 बळी घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत शाहिन आफ्रिदीच्या १८ विकेट्स, मोठमोठ्या विक्रमांची घातली रास
‘शाहीन, १९ वर्षांचा आहे तो, बिचाऱ्याला डिवचू नकोस’; पाकिस्तानी यष्टीरक्षकाचा आफ्रिदीला मजेशीर सल्ला