---Advertisement---

पाकिस्तानच्या गोलंदाजाला कोरोना संसर्ग; या स्पर्धेतून घेतली माघार

On: गुरूवार, नोव्हेंबर 18, 2021 11:25 PM
pak
---Advertisement---

पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. उपांत्य सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या स्पर्धेत पाकिस्तान संघाने आपला दबदबा ठेवला होता. विशेषतः त्यांच्या गोलंदाजांनी. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांची खूप चर्चा झाली होती. आता पाकिस्तान संघाचा अजून एक माजी गोलंदाज चर्चेत आला आहे. त्याच्या गोलंदाजीने नव्हे तर कोरोनामुळे.

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने ट्विट करून माहिती दिली आहे की, त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे अबुधाबी येथे होणाऱ्या आगामी टी१० लीगमध्ये भाग घेऊ शकणार नाही आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे, पण लवकर बरा होण्यासाठी चाहत्यांच्या प्रार्थनांची गरज असल्याचेही त्याने सांगितले आहे. मोहम्मद आमिरने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, संघाचे व्यवस्थापन बदलल्यानंतर त्याने पुन्हा पुनरागमनासाठी होकार दिला होता.

मोहम्मद आमिरने ट्विट करून लिहिले, ‘माझा सर्वांना नमस्कार! मी या वर्षी टी१० लीग खेळणार नाही, एवढेच सांगायचे होते. कारण मला कोविडचा त्रास सुरू झाला आहे. पण आता मी ठीक आहे. लवकर बरे होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज आहे.’ मोहम्मद आमिरच्या चाहत्यांनी तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

मोहम्मद आमिर अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो जगभरात चालणाऱ्या विविध प्रकारच्या लीगमध्ये सहभागी होत आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने भाग घेतला होता. ज्यामध्ये त्याची कामगिरी ठीकठाक होती. आता तो अबुधाबी येथे होणाऱ्या टी१० लीगमध्ये भाग घेणार होता, पण त्याने माहिती दिली की कोरोनामुळे तो या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

टी२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानी चाहते आणि खेळाडूंनी जल्लोष करायला सुरुवात केली. मात्र याचदरम्यान मोहम्मद आमिरने ट्विटरवर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगवर कमेंट केल्याने दोन्ही खेळाडूंमधील वाद वाढला होता. हे दोन्ही खेळाडू ट्विटरवर एकमेकांविरोधात खूप बोलले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---