भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मविरुद्ध लढत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात देखील कोहली विशेष कामगिरी करण्यास अपयशी ठरला. या सर्व गोष्टी लक्षात घेता भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने कोहलीच्या खराब कामगिरीवर भाष्य केले आहे.
“जेव्हा कोहली अर्धशतक करतो तेव्हाही असे वाटते की तो अयशस्वी झाला आहे. हे खरे आहे की त्याने या वर्षी फारसे प्रभावित केले नाही, प्रत्येक खेळाडू, अगदी सर्वोत्तम देखील, त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून गेला आहे. कोहली सातत्याने क्रिकेट खेळत आहे आणि आता त्याला थोडा ब्रेक मिळाला आहे, तो इंग्लंडमध्ये फॉर्ममध्ये परत येईल,” असा विश्वास अझरुद्दीनने व्यक्त केला आहे.
सोबतच अझरुद्दीन म्हाणाला की, “कोहलीच्या खेळात कोणतीच चूक नाही, काही वेळा तुम्हाला नशीबाचीही गरज असते. एखादी मोठी खेळी किंवा शतक त्याची आक्रमकता परत आणेल आणि तुम्हाला तो पूर्णपणे वेगळा दिसेल.” त्यामुळे आता भारताच्या माजी कर्णधाराने सांगितल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराटला मिळालेल्या विश्रांतीची त्याला फायदा मिळेल अशी आशा आहे.
आयपीएल संपल्यानंतर ९ जूनपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघात ५ टी२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी यांच्यासह विराट कोहलीला देखील विश्रांती दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अविरत खेळत असणाऱ्या भारताच्या मुख्य खेळाडूंनी आगामी टी२० विश्वचषकासाठी फिट असणे महत्त्वाचे असल्याने ही विश्रांती दिली गेली आहे.
दरम्यान, विराटने यंदाच्या आयपीएल हंगामात १६ सामने खेळत २२.७३च्या सरासरीने आणि ११५.९८च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, विराट यंदा तीन सामन्यांत ० धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकवेळा टीका करण्यात येत आहे. आता या टीकाकारांना कोहली कसा उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटर्सच्या शोधासाठी ‘या’ क्लबने लढवली अनोखी शक्कल, थेट बिअरचा ग्लास अन् टिंडरवर दिली जाहिरात
तोडीस तोड! दक्षिण आफ्रिकेचे ‘हे’ ४ गोलंदाज भारताच्या फलंदाजांवर पडू शकतात भारी, एकाने गाजवलीय आयपीएल