मुंबई । कोरोना व्हायरसच्या सावटात कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी 29 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने काही वरिष्ठ खेळाडूंना पुनरागमनाची संधी दिली आहे. 39 वर्षीय मोहम्मद हाफीज याचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे.
मोहम्मद हाफीज सोबत वहाब रियाज या वरिष्ठ गोलंदाजाने देखील पाकिस्तान संघात पुनरागमन केले आहे. 29 सदस्यीय संघात मोहम्मद हाफीजला स्थान देण्यात आल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक यांच्यावर टीका करण्यात आली होती.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि समालोचक रमीज राजा यांनी वरिष्ठ खेळाडूंना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. रमीझ राजा यांच्या विधानानंतर मोहम्मद हाफिज चांगलाच भडकला.
मोहम्मद हाफिज म्हणाला, “निवृत्तीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मला आहे. कुणाच्या सांगण्यावरून मी निवृत्त होणार नाही. रमीज राजा यांचे व्यक्तिगत मत असू शकते. त्यांना मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.”
तो म्हणाला, “मी कुणाच्या सांगण्यावरून क्रिकेट खेळत नाही किंवा कुणाच्या सल्ल्यानंतर मी क्रिकेट सोडणार नाही. क्रिकेटच माझे जीवन आहे. यातून निवृत्ती घेण्याचा देखील अधिकार माझाच आहे.”
तो म्हणाला, “कोणत्याही खेळाडूच्या कारकीर्दचा निर्णय त्यांच्या वयावर आधारित असू नये. जर तो फिट असेल, चांगली कामगिरी करत असेल आणि देशासाठी काही वेगळं करण्याची इच्छा असेल तर अडचणी काय आहेत? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच वेळ पडली तर इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्यास देखील तयार असल्याचेही हाफिजने यावेळी नमूद केले.”
पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने 55 कसोटी सामने खेळल्यानंतर कसोटीमधून निवृत्ती घेतली होती. मात्र वनडे आणि टी 20 मध्ये खेळणे सुरू ठेवले. त्याने आतापर्यंत 218 वनडे आणि 91 टी 20 सामने खेळले आहेत.