सध्या बांग्लादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. येथे उभय संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे सुरू असून, या सामन्यात पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यानं जबरदस्त फलंदाजी केली. रिझवाननं धमाकेदार शतक ठोकून एक विशेष कामगिरी केली आहे. त्यानं भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मोठा विक्रम मोडला.
मोहम्मद रिझवान आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्यानं रिषभ पंतला मागे टाकलं. बांग्लादेशविरुद्ध रिझवाननं 39 धावांचा टप्पा पार करताच पंतला मागे सोडलं. रिषभ पंतनं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 24 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 41.44 च्या सरासरीनं 1575 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
मोहम्मद रिझवाननं जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये 11व्या वेळा 50 धावांचा आकडा गाठला. आता या बाबतीत तो केवळ रिषभ पंतच्याच मागे आहे. कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम रिष पंतच्या नावे आहे, ज्यानं 12 वेळा ही कामगिरी केली आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला होता. बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचे तीन प्रमुख फलंदाज अवघ्या 16 धावांवर तंबूत परतले. स्टार फलंदाज बाबर आझम भोपळाही फोडू शकला नाही.
यानंतर सॅम अयुबनं सौद शकीलसोबत डाव सांभाळला. अयुबनं 56 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर शकीलनं 141 धावा ठोकल्या. मोहम्मद रिझवान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरं शतक झळकावलं. तो 171 धावा करून नाबाद राहिला. त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत आला. पाकिस्ताननं पहिला डाव 448/6 धावांवर घोषित केला आहे.
हेही वाचा –
कॅप्टन रोहित बार्बाडोसनंतर आता पाकिस्तानात फडकावेल तिरंगा! जय शहांची भविष्यवाणी
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत रोहित-विराट नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल मॅच विनर, ऑसी दिग्गजाचा विश्वास
‘यारो का यार गब्बर’! मुलाखत थांबवून शिखर धवनने रिषभ पंतला मारली मिठी, फोटो व्हायरल