बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा दुसऱ्या देशात हलवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान यानं टीम इंडियाच्या खेळाडूंना एक खास संदेश दिला. भारतीय खेळाडूंचं पाकिस्तानात स्वागत असल्याचं तो म्हणाला.
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील एका चाहत्यानं भारतीय टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात न जाण्याचं कारण विचारलं होतं. यावर सूर्या म्हणाला की, हे आमच्या हातात नाही. यावर मोहम्मद रिझवानला प्रतिक्रिया विचारण्यात आली.
रिझवान म्हणाला, “केएल राहुल, सूर्यकुमार यादव सर्वांचं स्वागत आहे. जे खेळाडू येतील, त्यांचं आम्ही स्वागत करू. हा आमचा निर्णय नाही, हा पीसीबीचा निर्णय आहे. जो काही निर्णय घेतला जाईल, आशा आहे की ते सर्वजण चर्चा करून घेतील. मात्र भारतीय खेळाडू आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू.”
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, 2023 मध्ये जेव्हा भारतानं एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन केलं होतं, तेव्हा पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात आला होता. पाकिस्ताननं भारतातील पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने खेळले होते. मात्र, ते उपांत्य फेरीत पोहचू शकले नव्हते.
नुकत्याच समोर आलेल्या काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्यास सहमत नसेल तर आयसीसी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवू शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ आक्षेप नोंदवू शकतो आणि स्पर्धेत सहभागी होण्यास नकार देऊ शकतो.
भारतानं गेल्या वर्षी पाकिस्तानात आयोजित आशिया चषक खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत हलवण्यात आले होते. यावेळी मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आता आयसीसी यावर काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
पाकिस्तानबाहेर खेळली जाऊ शकते चॅम्पियन्स ट्रॉफी? आयसीसी लागली तयारीला!
गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय! तीन वेळच्या आयपीएल विजेत्याला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त केले
पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी जगातील नंबर 1 गोलंदाज! जसप्रीत बुमराहचं स्थान कितवं?