मुंबई । कोरोना व्हायरसने जगात हाहाकार वाजवल्यामुळे अनेक खेळाडूंना गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये राहावे लागले. लॉकडाऊन असल्याने एकही क्रिकेटचा सामना झाला नाही. दरम्यान, भारताचा ‘रिव्हर स्विंग स्पेशालिस्ट’ गोलंदाज मोहम्मद शमी लॉकडाऊनमुळे फायदा अन तोटा झाल्याचे सांगितले.
एका मुलाखतीमध्ये शमी म्हणाला, “लॉकडाऊनच्या दरम्यान फिटनेसवर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझा फिटनेस चांगला झाला. लॉकडाऊनमुळे थकलेल्या शरीराला आराम मिळाला. मात्र बरेच दिवस गोलंदाजी न केल्याने गोलंदाजीची लय खराब झाली. त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.”
लॉकडाऊनमध्ये शमी सहारनपुर गावातल्या घराजवळील अंगणात क्रिकेटचा सराव करत होता. तसेच त्याने घराजवळच एक छोटेसे क्रिकेटचे मैदान देखील तयार केले आहे. तो शहराबाहेर राहत असल्याने त्याला सराव करण्याची संधी मिळाली. भारतीय संघाचा कार्यक्रम नेहमीच व्यस्त असतो. या दरम्यान ब्रेक मिळाल्याने शरीराला आराम मिळाला.
बीसीसीआय खेळाडूंसाठी सराव शिबीर सुरू करण्याच्या तयारीत आहे. या सराव शिबिराचा खेळाडूंना फायदा होईल, असे शमीला वाटते.
“कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने चेंडूला लाळ लावण्यास प्रतिबंध घातला आहे. चेंडूला लाळ लावण्याची सवय मोडण्याचे काम नेट्समध्ये सराव करताना करावे लागेल,” असे शमीने नमूद केले.
“नेट्समध्ये सराव करताना नव्या कोऱ्या चेंडूने मी सराव करण्याचा प्रयत्न करीन. तसेच सरावाच्या दरम्यान चेंडूला लाळ लावण्याची सवय मोडण्याचा प्रयत्न करेन. लोक मला या संदर्भात अनेकदा प्रश्न विचारतात, पण मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही. चेंडूला लाळ लावणे ही सवय झाली आहे. चेंडूला लाळ न लावता गोलंदाजी केल्यानंतरच सर्व काही कळून येईल,” असे शमी म्हणाला.
शमीने भारताकडून खेळताना 49 कसोटी सामन्यात 180 बळी टिपले आहेl.