लीड्समधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर मोठी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने प्रथम शानदार गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला फक्त 78 धावांवर गुंडाळले. यानंतर, यजमान संघाने पहिल्या डावात 432 धावा केल्या आहेत. जो रूटच्या शानदार शतकामुळे इंग्लंडकडे पहिल्या डावात 354 धावांची आघाडी आहे. तरी भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली केली असून तिसऱ्या दिवसाखेर 2 बाद 215 धावा केल्या आहेत. अजूनही पिछाडी भरुन काढण्यासाठी 139 धावांची गरज आहे.
अजून दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे, अशा स्थितीत पराभव टाळण्यासाठी भारतीय संघाच्या फलंदाजांना करिश्माई प्रदर्शन करावे लागेल.
दरम्यान, भारतीय संघाची दुर्दशा पाहून क्रिकेट चाहते रविचंद्रन अश्विनला संघाबाहेर ठेवण्याच्या विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनला बाकावर बसावे लागले आहे. या गोलंदाजाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तीन बळी घेतले होते. काउंटी क्रिकेटमध्ये खेळत असताना 6 बळी आपल्या नावे केले होते. भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची रणनीती आखत आहे, ज्याचा फटका अश्विनला सहन करावा लागत आहे. फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाला त्याच्या फलंदाजीमुळे प्राधान्य मिळत आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी, जेव्हा मोहम्मद शमीला अश्विनशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा हा गोलंदाज म्हणाला, “मला निवडीवर भाष्य करायला आवडणार नाही. हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. मैदानावरील 11 खेळाडूंना त्यांचे काम करावे लागेल. आम्हाला सामन्यात परत यायचे आहे. आपण याबद्दल जास्त विचार करू शकत नाही.”
दुसरीकडे, तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून आतापर्यंत एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आहेत. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली. या दोघांनी 135 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या टी20 स्टार डेव्हिड मलाने 70 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलग तिसरं शतक ठोकलं आहे. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीचे स्केच दाखवणाऱ्या चाहत्याला पाहून, इंग्लिश प्रेक्षकांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, फोटो व्हायरल
दिनेश कार्तिकने केला समालोचनाला रामराम! ‘हे’ आहे कारण
क्रिस केर्न्सच्या प्रकृतीत झाला बिघाड; शस्त्रक्रियेनंतर पायाकडील भागांना मारला लकवा