भारतीय क्रिकेट संघाचा आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवरील संकटे दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
डेहराडूनहून दिल्लीकडे जात असताना शमीच्या कारला हायवेवरील एका ट्रकने टक्कर मारली . या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून टाके पडले आहे.
मागील काही दिवसांपासून होणाऱ्या आरोपांमूळे तो मानसिक आणि शारीरिकरित्या थकला होता. त्या थकव्यातून बाहेर येण्यासाठी 27 वर्षीय शमी डेहराडूनमधील अभिमन्यु क्रिकेट अकादमी येथे दोन दिवस प्रशिक्षिण घेण्यासाठी गेला होता. ही अकादमी बंगालचा फलंदाज आणि भारत ‘अ’ चा खेळाडू अभिमन्यु इसवारनचे वडिल चालवतात.
” शमी पूर्णपणे बरा आहे. तो सध्या विश्रांती घेत असून उद्या दिल्ली परत जाणार आहे. त्याला अजून कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून तो आयपीएल खेळण्यास सज्ज आहे,” असे शमीच्या कार अपघातानंतर अभिमन्यु इसवारनच्या वडीलांनी सांगितले.
शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने विवाह बाह्य संबंध असल्याचा आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केले होते. तसेच तिने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचेही आरोप केले होते. शमीने हे सर्व आरोप नाकारले आहेत.
या आरोपानंतर लगेचच बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार स्थगित केला होता. पण आता त्याच्यावर असलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपाची चौकशी झाल्यानंतर बीसीसीआयने त्याला निर्दोष घोषित केले. तसेच त्याला खेळाडूंच्या वार्षिक कराराच्या B श्रेणीतही स्थान दिले आहे.