पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने काही दिवसांपूर्वी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत सर्वांना चकित केले. २०१९ साली त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तरीही मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा तो भाग होता. पण त्यानंतर अचानक त्याने वनडे आणि टी२० मधूनही निवृत्त होण्याचे मन बनवले. आता आमिरने त्याच्या तडकाफडकी निवृत्तीमागील कारणाचा खुलासा केला आहे.
या दोन अनुभवी क्रिकेटपटूंना ठरवले जबाबदार
वयाच्या केवळ २८व्या वर्षी क्रिकेटची साथ सोडण्याऱ्या आमिरने निवृत्तीसाठी संघ व्यवस्थापनाला जबाबदार ठरवले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक वकार यूनुस यांच्यावरही त्याने टीका केली आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आमिरने स्पष्ट केले की, “माझी सर्वात मोठी समस्या मिस्बाह आणि वकार होते. त्यांनी हळूहळू लोकांच्या डोक्यात माझ्याविषयी विष भरले की, मला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. मला फक्त पैसे कमावण्यासाठी टी२० लीग खेळायच्या आहेत. अर्थातच त्यांनी लोकांच्या मनात अशी धारणा निर्माण केली की, माझ्याकडून संघाला खूप अपेक्षा असतानाही मी मुद्दाम संघाला अपमानित केले.”
“मिसबाह आणि वकार यांनी माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला. कुणालाही आपले नाव बनवण्यात खूप मेहनत करावी लागते. माझ्यासाठी अचानक निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय खूप कठीण होता. पण आता शांत बसण्याची वेळ नाही. हे प्रकरण लोकांपुढे आणून सर्वांना सत्य कळवण्यासाठी मी हा निर्णय घेतला,” असे पुढे बोलताना आमिरने सांगितले.
तसेच शेवटी आमिरने सांगितले की, “न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ३५ सदस्यीय पाकिस्तान संघामध्ये मला दुर्लक्षित करण्यात आले. त्यानंतर मी संघ व्यवस्थापनाला माझी निवड न करण्यामागचे कारण विचारले होते. जर मला फक्त टी२० लीगवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असते, तर न्यूझीलंड दौऱ्यावरुन बाहेर केल्यानंतर मला वाईट वाटले नसते. मी संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली नसती.”
मोहम्मद आमिरची कामगिरी
मोहमद आमिरने पाकिस्तान संघासाठी ३६ कसोटी, ६१ वनडे आणि ५० टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण २५९ विकेट्स आपल्या नावावर केले आहेत. आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे आमिर खूप प्रसिद्ध राहिला आहे आणि मोठ- मोठ्या फलंदाजांना आपल्या समोर गुडघे टेकायला भाग पाडले आहे.
वनडेत त्याने एका सामन्यात ३० धावा देवून ५ विकेट घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कसोटीत त्याने एका डावात ४४ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या आहेत. तिन्ही प्रकारात त्याची इकोनॉमी चांगली राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद आमिरच्या निवृत्तीला शोएब अख्तरचा पाठिंबा, म्हणाला….
“…तर भारताला व्हाईटवाॅश करण्याची ऑस्ट्रेलियाला संधी”, रिकी पॉन्टिंगचे वक्तव्य